हायकोर्ट : पोलीस पहाऱ्यात नेले जाईलनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दहशतवाद्याला मुलाच्या लग्नात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पोलीस पहाऱ्यात लग्नस्थळी नेले जाईल व नंतर परत आणले जाईल.मो. फारुख मो. युसुफ शेख असे दहशतवाद्याचे नाव आहे. १९९७ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला विविध कलमांतर्गत ५५ वर्षे कारावासाची शिक्षा झाली आहे. त्याच्या मुलाचे लग्न २५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे तर, स्वागतसमारंभ २ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे आहे. दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी मिळण्यासाठी त्याने अमरावती विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी अर्जावर काहीच निर्णय घेतला नाही. यामुळे त्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष बुधवारी याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार, फारुखला २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत लग्नस्थळी नेले जाईल व २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत कारागृहात परत आणले जाईल. त्याची स्वागत समारंभात सहभागी होण्याची विनंती विचारात घेण्यासाठी प्रकरणावर २७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
दहशतवाद्याला मुलाच्या लग्नात जाण्याची परवानगी
By admin | Published: September 22, 2016 3:06 AM