लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. महापालिका मुख्यालय आणि झोन कार्यालयात कर्मचारी पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता शासनाच्या दिशानिर्देशानुसार २५ टक्के उपस्थिती ठेवावी. तसेच मनपा कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिएशनने मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, कार्यालयात गर्दी होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी. ज्या कर्मचाऱ्यांना कोविड-१९ अंतर्गत कामे दिली आहेत व देण्यात येणार आहे त्यांना लेखी आदेश द्यावे. गेल्या वर्षभरापासून कोविड सेवेत असलेल्यांना विश्रांती देऊन शहरातील खासगी शाळातील शिक्षक, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवा घ्यावी, अशी मागणी संघटनेचे जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी केली आहे.