लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांत शहरातील कोरोनाबाधितांची संख्यया कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. परंतु खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. याचा विचार करता संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महापालिकेने टेस्टिंग मोहीम हाती घेतली आहे. शहरातील दुकानदार, भाजीपाला विक्रेते, शासकीय व खासगी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
सतरंजीपुरा झोनमध्ये ‘चाचणी आपल्या दारी’ उपक्रम
सतरंजीपुरा झोनतर्फे मंगळवारी झोनचे साहाय्यक आयुक्त विजय हुमणे व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू पुतळा ते मस्का साथ चौक इतवारीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या प्रत्येक दुकानात ‘चाचणी आपल्या द्वारी’ उपक्रम राबविला. दुकानमालक व येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली; तसेच रस्त्यावर विनामास्क वावरत असणाऱ्या नागरिकांची जागीच चाचणी करण्यात आली. यात २१७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. चाचणी करण्यात आलेल्या नागरिकांना त्यांचा रिपोर्ट फोनवर कळविण्यात येईल.
उद्दिष्टपूर्तीच्या धास्तीत कर्मचाऱ्याचा अपघात
महापालिका प्रशासनाने कोरोना चाचणीचे प्रत्येक झोनला उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्टपूर्तीच्या धास्तीत कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. अशा तणावात काम करताना मंगळवारी मिट्टीखदान चौकात वाहनधारकाला थांबविण्याच्या प्रयत्नात मंगळवारी झोनमधील प्रभारी कर निरीक्षक स्वप्निल पाटील याला दुचाकीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यावश्यक सेवा बजावत असताना कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या उपचाराची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिएशनने केली आहे.
११ फिरती चाचणी केंद्रे
टेस्टिंग वाढविण्यासाठी ११ फिरत्या चाचणी केंद्राद्वारे शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांच्या कोरोना चाचण्या करीत आहेत. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांना वेळीच उपचार करता यावेत, या हेतूने ही मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.
११.५० हजार चाचण्या
आतापर्यंत नागपूर शहरात एकूण १८ लाख ५९ हजार ९५९ अधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात बाधितांची संख्या तीन लाख २६ हजार ८३५ आहे. ही टक्केवारी १७ टक्के आहे. मात्र मागील काही दिवसांत ती कमी झाली आहे.