(लंगडी आरोग्य सेवेचा लोगो वापरावा)
सुमेध वाघमारे
नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे हाडांची घनता, हाडात असलेले कॅल्शियम व अन्य मिनरल्सची माहिती मिळविण्यासाठी मेडिकलने ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची खरेदी केली; परंतु औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) व अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक) सोडल्यास इतर विभागाला या यंत्राचे वावगे असल्याचे चित्र आहे. परिणामी, दीड कोटी रुपयांच्या या यंत्रावर चार वर्षांत केवळ १०८५ रुग्णांचीच चाचणी झाली आहे. महागड्या यंत्राचा गरीब रुग्णांना लाभ कधी मिळणार, हा प्रश्न आहे.
मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावेत म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून २०१७ मध्ये ‘ड्युअल एनर्जी एक्सरे एब्जॉर्पटियोमेट्री’ (डेक्सा) स्कॅन यंत्राची खरेदी करण्यात आली. या अद्ययावत यंत्रामुळे ‘ऑस्टिओपॅनिया’ व ‘ऑस्टिओपोरोसिस’ आजाराचे अचूक निदान होते. या यंत्रामुळे रुग्णाला पॅथॉलॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासत नाही. शिवाय एक्सरेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्गदेखील अत्यंत कमी स्वरूपात असतो. एका क्लिकवर हाडांची घनता मोजता येते. उपराजधानीत हे यंत्र मेडिकलसह आणखी दोन खासगी केंद्रांत आहे. खासगीच्या तुलनेत मेडिकलमध्ये माफक दरात उपलब्ध आहे. यामुळे या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होईल व रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु मेडिसिन व ऑर्थाेपेडिक विभाग सोडल्यास इतर विभागातून रुग्ण पाठविलेच जात नसल्याचे समोर आले आहे.
-या रुग्णांसाठी हे यंत्र महत्त्वाचे
५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी आपल्या हाडाची घनता तपासण्यासाठी, ‘मेनोपॉज’नंतर महिलांनी, कमी वयात गर्भाशय काढलेल्या महिलांनी व नेहमीच हाडात दुखणे असणाऱ्या अणि लवकर थकावट येणाऱ्यांनी विशेषज्ञाच्या सल्ल्यानुसार ‘डेक्सा स्कॅन’ करायला हवे. याशिवाय, लांब कालावधीपर्यंत ‘स्टेरॉइड’ किंवा ‘अँटिसायकेट्रिक’ औषधी घेणाऱ्यांनी व ‘मेटाबॉलिक बोन डिसिज’ असणाऱ्यांनी किंवा अचानक उंची कमी होणाऱ्यांनी यावर चाचणी करायला हवी.