सावनेर/ कळमेश्वर/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही/ रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅन्टिजन टेस्ट मिळून ३४५२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १८१४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण भागात सोमवारी १६ मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत ग्रामीण भागात १,१८,८१० कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यातील ८५,६६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सोमवारी ही संख्या २००५ इतकी होती.
सावनेर तालुक्यात १४३ रुग्णांची भर पडली तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये ११४ रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात ६१ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील ४० तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कळंबी, वरोडा येथे प्रत्येकी चार, निमजी, केतापार, आदासा, घोराड येथे प्रत्येकी दोन तर घोगली, बेल्लारी, बोरगाव, पिपळा, मोहपा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात ८७ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २८ तर ग्रामीण भागातील ५९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७१५ तर शहरातील ६६५ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावांत ५१ तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत ८ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४२५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ९, डिगडोह (६), हिंगणा (२), निलडोह, टाकळी व गिरोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १०,५५९ इतकी झाली आहे. यातील ८,१०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सोमवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला.
रामटेक तालुक्यात ६१ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १६ तर ग्रामीण भागातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६०३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ९६ रुग्णांचा मृत्यू झाला.
उमरेड तालुक्यात ९७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६५ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. कुही तालुक्यात गत दोन दिवसांत ५४१ नागरिकांच्या चाचण्यांत ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथील १२, मांढळ (२२), वेलतूर (१४), साळवा (१९) व तितूर केंद्रावरील ०९ रुग्णांचा समावेश आहे.
काटोलची साखळी तुटेना
काटोल तालुक्यातील कोरोनाची साखळी अबाधित आहे. सोमवारी तालुक्यात १२७ रुग्णांची भर पडली. तालुक्यात ६७२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात शहरातील २२ रुग्ण तर ग्रामीण भागातील १९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात कोंढाळी केंद्राअंतर्गत ४६, कचारी सावंगा (३९) तर येनवा केंद्राअंतर्गत २० रुग्णांची नोंद झाली.