लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत असलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या टेक्सटाईल कमिशनरच्या ‘पीए’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सिव्हिल लाईन्स येथील टेक्सटाईल कमिशनर कार्यालयात एसीबीने कारवाई केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. आरोपी धरमपेठ टांगा स्टॅण्ड चौक येथील ५७ वर्षीय सुरेश वर्मा आहे.
वर्मा हा टेक्सटाईल कमिशनर माधवी खोडे यांचा पीए आहे. अनेक वर्षांपासून येथे कार्यरत आहे. तक्रारकर्ता सुरक्षा एजन्सी चालवितो. त्याच्याकडे विणकर सहकारी सूतगिरणीच्या सुरक्षेचे काम आहे. त्याचे ८ गार्ड येथे तैनात आहेत. सूत्रांच्या मते, ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ दरम्यान तक्रारकर्त्याला ३४.५६ लाख रुपयांचे धनादेश मिळाले होते. परंतु एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०१९ व डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील ९.४६ लाख रुपयांचे बिल थकीत होते. या बिलाची पूर्तता करण्यासाठी तक्रारकर्त्याने टेक्साईल कमिशनरच्या ‘पीए’ची भेट घेतली. वर्माने बिलच्या मंजुरीसाठी ७ लाख रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. एसीबीने तक्रारकर्त्याची चौकशी केली. यात वर्मा लाच मागत असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर एसीबीने वर्माला पकडण्याची योजना आखली.
तक्रारकर्त्याशी झालेल्या चर्चेतून वर्मा ५ लाख रुपयांत बिल मंजूर करण्यास तयार झाला. एसीबीने त्याला पकडण्यासाठी योजना आखली. दरम्यान, वर्मा याला संशय आला. तो पैसे घेण्यास टाळाटाळ करू लागला. एसीबीने अनेकदा तक्रारकर्त्याच्या माध्यमातून त्याला पकडण्याचा सापळा रचला. परंतु त्याने सातत्याने नकार दिला. अखेर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून वर्माला अटक केली. कारवाईची माहिती मिळताच टेक्सटाईल कमिशनर कार्यालयात खळबळ उडाली. एसीबीने वर्माचे कार्यालय व घराची तपासणी केली. त्यात चल व अचल संपत्तीचे दस्तावेज मिळाल्याची माहिती आहे. वर्माविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षानंतर टेक्सटाईल विभागाचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार, निरीक्षक भावना धुमाळ, कर्मचारी सुनील कळंबे, लक्ष्मण परतेकी, राहुल बारई यांनी केली.