वन विभागाची चमू दाखल : कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघाची दहशतकोंढाळी : कोंढाळी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या धोटीवाडा-खापा मार्गालगतच्या शिवारात गेल्या चार दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने ठाण मांडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांत वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे. वाघाच्या सुरक्षेकरिता वन विभागाने राज्य राखीव पोलीस दल तैनात केले आहे.धोटीवाडा -खापा मार्गालगच्या ओंकार चव्हाण व मोहन सुखा चव्हाण यांच्या शेतालगत एक पट्टेदार वाघ फिरतांना आढळला. दरम्यान, मंगळवारी ओंकार चव्हाण यांच्या शेतातील कपाशी पिकांत वाघाने ठाण मांडले. शेतकऱ्यांनी आरडाओरड करुन वाघाला हाकलण्यासाठी प्रयत्न चालविले. परंतु वाघाने ठिय्या न सोडल्याने शेतकऱ्यांनी वन विभागास सूचना दिली. याबाबत माहिती मिळताच कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी व कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी धोटीवाडा-खापा मार्गापासून जवळपास १०० मीटर अंतरावर ओंकार चव्हाण यांच्या शेतात हा वाघ बसलेला आढळला. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या शिवारात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. सदर वाघाबाबत माहिती मिळताच, एसीएफ ए. आर. वाघमारे व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वन अधिकाऱ्यांनी वाघाच्या सुरक्षेकरिता राज्य राखीव पोलीस दलास पाचारण केले असून नागरिकांची गर्दी आटोक्यात आणली. खापा नजीकच्या बोर व्याघ्र प्रकल्पातून हा वाघ धोटीवाडा, खापा या संरक्षित वनात आला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सदर वाघाला शांत बसू दिल्यास तो रात्री येथून निघून जाईल, असेही अधिकारी म्हणाले. सदर वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी घेराबंदी केली असून परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. (वार्ताहर)
खापा शिवारात वाघाचे ठाण
By admin | Published: January 06, 2016 3:49 AM