नागपूर - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर टीका केली. नागरिकत्व दूरुस्ती कायद्याला शिवसेनेने दर्शवलेलं समर्थन पाठिमागे घेतल्यावरुन गडकरी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. राज्यातील सत्तांतरावर बोलताना, तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले याचा अर्थ आम्ही बलवान आहोत. या सरकारमध्ये ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे भाकितही गडकरींनी केले आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर नितीन गडकरींनी हल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेनेलाही टार्गेट केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते बांग्लादेशींना मुंबईतून हाकला. मात्र, आता शिवसेना यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. हिंदुत्व, मराठी माणुस हे सगळे मुद्दे त्यांनी सोडून दिले. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि मराठी माणूस शिवसेनेवर नाराज आहे. सावरकरांना शिवसेना मानते. पण, काँग्रेस त्यांच्याविरोधात वक्तव्य देते. सत्तेसाठी त्यांना दुर्बलता व लाचारी पत्करावी लागत आहे, स्वतःचे विचार सोडावे लागत आहेत.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आजपासून भाजपातर्फे जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येत आहे. देशभरात हे अभियान सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.