योगेश पांडे नागपूर : विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत व निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय दिला आहे. हक्कभंग समितीतदेखील शिवसेनेचे आमदार आहेत. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय पटत नसेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना नेते खा.संजय राऊत जे बोलतात त्यांना उध्दव ठाकरे यांची मान्यता असते. राऊत यांनी १२ कोटी जनतेच्या मतांचा अपमान केला आहे. हक्कभंग समिती जे कारवाई करायची ती करेल पण उध्दव ठाकरे यांनी राऊत यांच्यावर कारवाई करावी किंवा फेसबुक लाईव्ह करून भूमिका स्पष्ट करावी. संजय राऊत जे बोलले ते उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का, यावर सगळे पक्ष बोलले ते का बोलत नाही असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. तसे पाहिले तर संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. परंतु ते कारागृहात राहून आले त्यामुळे त्यांना माफी मागण्याची सवय नाही, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.