नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करीत भाजपने व्हेरायची चौकात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. याला उद्धव ठाकरे गटानेही बुधवारी जशास तसे उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी भाजपविरोधी घोषणाबाजी करीत भाजपच्या कुठल्याही नेत्याने जोडे मारण्याची भाषा करून नये, तेच त्यांच्यावरही उलटू शकतात, असा इशाराही देण्यात आला.
वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस हे नागपूरवर कलंक असल्याची टीका केली होती. याच्या निषेधार्थ भाजपने उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडले व पुतळाही जाळला होता. याविरोधात बुधवारी उद्धव ठाकरे गटातर्फे व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, सुरेश साखरे, सतीश हरडे, हर्षल काकडे, बोडखे, सुरेखा खोब्रागडे, विशाल बरबटे आदींनी आंदोलनात भाग घेतला. यापुढे उद्धव ठाकरे यांच्याबाबत कुणी चुकीचे वक्तव्य केले किंवा त्यांचे पोस्टर फाडण्यात आले तर शिवसैनिक खपवून घेणार नाही व जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा प्रकाश जाधव यांनी यावेळी दिला.
पोलिसांची नजर चुकवलीच
- आंदोलनस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त होता. कोणत्याही प्रकारच्या पुतळ्याचे दहन केले जाऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. मात्र, पोलिसांची नगर चुकवून कार्यकर्त्यांनी पुतळा आणला व त्याचे दहनही केले. पोलिसांनी यावेळी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पुतळ्याला लावण्यात आलेली आग विझवली.