योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी ऐक्याची भूमिका मांडली आहे. ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे. सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांवर मत मांडले.
देशात केवळ दोनच पक्ष असावेत अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मात्र आंबेडकरी पक्ष जास्त काळ एकत्रित राहू शकले नाहीत. आरपीआयमध्येदेखील फूट पडली व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता आंबेडकरी ऐक्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारले तर सर्व आंबेडकरी पक्ष एकत्रित येऊ शकतात. माझा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मात्र आंबेडकरांकडून अद्याप हवी तशी साथ मिळालेली नाही. स्वबळावरच लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी खरे तर बाबासाहेबांच्या विचारातून समोर आलेला पक्षच चालविला पाहिजे, असे आठवले म्हणाले.
तर महाविकासआघाडीतून उद्धव दूर होतीलउद्धव ठाकरे व राज ठाकरे सोबत यावे अशी माझीदेखील इच्छा आहे. ते सोबत आले तर महाविकास आघाडीत निश्चित फूट पडेल. महाविकासआघाडी कधीही राज ठाकरे यांना सोबत घेणार नाही. त्याचा फटका मविआला बसेल. मात्र कुणीही एकत्रित आले तरी महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
बौद्धगयेसाठी पंतप्रधानांना भेटणारबौद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापक आंदोलन सुरू आहे. याचा तोडगा निघावा यासाठी माझा प्रयत्न सुरू असून मी पंतप्रधानांना भेटणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
आम्हाला मतदारसंघच तयार करता आले नाहीतमी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते व मलादेखील त्यामुळे सत्तेत राहता येते. माझा स्वभाव ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नसल्यामुळे अनेकदा हक्काच्या गोष्टीदेखील आम्ही मिळवू शकत नाही. राजकीयदृष्ट्या पक्षाला हवी तशी मजबूती मिळाली नाही, कारण मतांच्या राजकारणात प्रभाव दाखवू शकलेलो नाही. पक्षासाठी समर्पित कार्यकर्ते असले तरी आम्हाला तगडे मतदारसंघ तयार करता आले नाही अशी खंत यावेळी आठवले यांनी बोलून दाखविली.