नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरात ३७, २१५ मतांची आघाडी घेतली. २०१९ मध्येही २७,२५२ मतांची आघाडी घेण्यात त्यांना यश आले. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी गडकरींची ही लीड भरून काढत ६,३६७ मतांनी विजय मिळविला. तब्बल ३२ वर्षानंतर ठाकरे यांच्या रुपात पश्चिम नागपुरात काँग्रेसचा उदय झाला. गडकरी व ठाकरे या दोन्ही नेत्यांनी पश्चिममध्ये आपापले प्राबल्य सिद्ध केले आहे. आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेते आमोरासमोर असल्यामुळे त्यांची खरी परीक्षा होणार असून पश्चिमचा ‘किंग’कोण हे स्पष्ट होणार आहे.
पश्चिम नागपूर मतदारसंघात कुणबी, बौद्ध, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन मतदारांचे प्राबल्य आहे. अलिकडच्या काळात हिंदी भाषिकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. गोधणी रोड व दाभाच्या बाह्य भागात मोठ्या प्रमाणात नवी लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर हा गुंतागुंतीचा मतदारसंघ झाला आहे. हा कुणबी बहुल मतदारसंघ मानला जात असला तरी काँग्रेसचे नाना पटोले यांना नितीन गडकरींच्या विरोधात कुणबी समाजाची फारशी साथ मिळाली नव्हती.विधानसभेच्या निवडणुकीत मात्र विकास ठाकरे व सुधाकर देशमुख या दोन्ही कुणबी नेत्यांच्या लढतीत कुणबी समाज ‘फिप्टी-फिप्टी’ विभागल्या गेला होता. विकास ठाकरे जिंकले पण मताधिक्य जास्त नव्हते. याची जाणीव त्यांनी सतत ठेवली. मतदारसंघातील वैयक्तिक ‘कनेक्ट’ वाढविण्यासोबतच सोशल इंजिनिअरिंगवर त्यांनी भर दिला.पश्चिम नागपुरातील एक-दोन भूमीपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी गडकरी व ठाकरे हे एकमेकांची प्रशंशा करतानाही दिसून आले होते. या मतदारसंघात गडकरींची भिस्त माजी नगरसेवकांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा वर्गही या मतदारसंघात आहे. तर विकास ठाकरे यांनी काँग्रेसची पक्ष संघटना व माजी नगरसेवकांसह स्वत:चे नेटवर्क उभे केले आहे. ठाकरे यांना गडकरींना टक्कर द्यायची असेल तर स्वत:च्या हक्काच्या मतदारसंघात जास्तीत जास्त आघाडी घेणे गरजेचे आहे. लोकसभेचा निकाल येईल तो येईल पण पश्चिम नागपुरात विकास ठाकरे मागे राहिले तर त्यांचा विधानसभेचा मार्ग कठीण होईल, आणि गडकरींना मागे ठेवण्यात यश आले तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पश्चिममध्ये प्रचाराची गरज भासणार नाही, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
--
अशी झाली पश्चिमची लढत-२०१४ मध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे यांना भाजपचे सुधाकरराव देशमुख यांनी एकतर्फी पराभूत केले होते. पक्षांतर्गत गटबाजीचा ठाकरेंना फटका बसला.यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना होता. पश्चिम नागपुरात गडकरी यांना तब्बल २७,२५२ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले व विधानसभा निवडणुकीतही येथे काँग्रेसला यश मिळणे कठीण जाईल, असे चित्र निर्माण झाले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विकास ठाकरे व सुधाकरराव देशमुख यांच्यात जुनीच लढत झाली. यावेळी ठाकरे यांनी काट्याची लढत देत विजय खेचला. तब्बल ३२ वर्षानंतर येथे ठाकरे यांच्या रुपात काँग्रेसला विजयी झेंडा रोवण्यात यश आले.
---१९८५ मध्ये गडकरी पश्चिम नागपुरातून पराभूतभाजप नेते नितीन गडकरी यांना १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले होेते. त्यावेळी काँग्रेस नेते गेव्ह आवारी यांनी गडकरी यांना पराभूत केले होते. या पराभवानंतर गडकरी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढले नाही. पुढे काही वर्षांनी त्यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाचा मार्ग निवडला व तेथून विधान परिषदेत पोहचले.--
बसपाचा प्रभाव उरला नाहीगेल्या काही निवडणुकींची मतांची आकडेवारी पाहता पश्चिम नागपुरात बसपाचा प्रभाव उरलेला नाही. २०१९ च्या लोकसभेत बसपाचे मोहम्मद जमाल यांनी ४,५९६ ते घेतली होती. विधानसभा निवडणुकीत ही मते दुप्पट झाली. अफजल फारूख यांनी ८,४२७ मते घेतली. दोन्ही निवडणुकीत मुस्लिम उमेदवार असतानाही बसपाला १० हजाराचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.--
वंचितची फारसी दखल नाही२०१९ च्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात असलेले सागर डबरासे यांनी पश्चिम नागपुरात ४, ३५९ मते घेतली होती. विधानसभा निवडणुकीत वंचितने येथून उमेदवाराच दिला नव्हता. त्याचा थेट फायदा काँग्रेसचे विकास ठाकरे यांना झाला. यावेळी लोकसभेच्या रिंगणात वंचितचा उमेदवार नाही. ही संधी काँग्रेसकडून कॅश केली जाण्याची चिन्हे आहेत.
२०१९ च्या लोकसभेत पश्चिम नागपूरनितीन गडकरी (भाजप) - १,०२, ९१६नाना पटोले (काँग्रेस) - ७५,६६४
मोहम्मद जमाल (बसपा)- ४,५९६सागर डबरासे(वंचित) - ४३५९
----------------२०१९ च्या विधानसभेत पश्चिम नागपूरविकास ठाकरे (काँग्रेस) : ८३,२५२सुधाकर देशमुख ( भाजप): ७६,८८५अफजल फारूख (बसपा) : ८४२७