ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 08:56 PM2018-02-07T20:56:20+5:302018-02-07T21:02:25+5:30

शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Thakare-Muttemwar BJP's 'B Team'! | ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

Next
ठळक मुद्देगेव्ह आवारींनी केली काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारदोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप‘लेटरबॉम्ब’मुळे पक्षातील वाद आणखी वाढणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. ठाकरे व मुत्तेमवार हे काँग्रेसमध्ये राहून भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप लावत आवारी यांनी दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
२०१४ पर्यंत नागपुरातून ‘सेक्यूलर’ उमेदवारच निवडून यायचे. मात्र विलास मुत्तेमवार हे नागपूरचे खासदार झाले आणि नंतर हे चित्र बदलले. ते अनेकवेळा निवडून आले, मात्र पक्षविरोधी कारवायादेखील सुरूच होत्या. यामुळेच २०१४ च्या निवडणुकांमध्ये ते २ लाख ८३ हजार मतांनी हरले. शहराध्यक्षांसोबत संगनमत करून त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी निष्ठा राखणाºया आणि पात्र सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पक्षात जवळच्या व्यक्तींना स्थान दिले. यामुळे मनपाच्या निवडणुकांत २००७ पासून २०१७ या कालावधीत सातत्याने तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये तर मुत्तेमवार-ठाकरे यांच्या जोडीने अनेक सक्षम नगरसेवकांना तिकिटे नाकारत आपल्या वतीने ‘एबी फॉर्म्स’चे वाटप केले. याचा फटका दारुण पराभवाच्या रूपात बसला. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहरात भाजपाचे एकहाती वर्चस्व आहे, असे गेव्ह आवारी यांनी पत्रात लिहिले आहे.
मुत्तेमवार यांच्यामुळेच विधान परिषदेच्या जागेवर भाजपाला बिनविरोध विजय मिळविता आला. २०१७ च्या मनपा निवडणुकांनंतर मुत्तेमवार व ठाकरे यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदावर बसविले. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी कायद्यानुसार जात आपला नेता निवडला. परंतु याविरोधात मुत्तेमवारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दोघांनीही पक्षविरोधी कारवायांचा कळसच गाठला आहे. यामुळे जनता व काँग्रेस सदस्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. पक्षाच्या अंतर्गत निवडणुका रद्द व्हाव्या यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही वेदनादायी बाब असून या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेव्ह आवारी यांनी केली. महाराष्ट्र राज्यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी काय पावले उचलावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी राहुल गांधी यांना पत्रातून केली आहे.

Web Title: Thakare-Muttemwar BJP's 'B Team'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.