नागपूर : थॅलेसेमियाच्या रुग्णांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध करून देण्याचा शासनाचे आदेश असताना डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘डेफेरासिरॉक्स’ औषधांचा तब्बल महिन्याभरापासून तुटवडा आहे. ही औषध रोज घ्यावी लागत असल्याने व बाजारात याची किंमत सामान्यांना परडवणारी नसल्याने औषधांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
‘थॅलेसेमिया’ हा रक्ताचा एक अनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये सामान्यांच्या तुलनेत लाल रक्तपेशींची संख्या कमी असते. कमी हिमोग्लोबीन आणि फार कमी लाल रक्त पेशींमुळे रुग्णाला खूप जास्त थकावट येते. या लाल रक्तपेशी फार गतीने नष्टही होतात. ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांना वारंवार रक्त देण्याची गरज पडते. अशावेळी काहींमध्ये लोह म्हणजे ‘आयरन’चे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी ‘डेफेरासिरॉक्स’ औषध दिली जाते. जी रोज रुग्णाला घ्यावी लागते. परंतु, डागा रुग्णालयात महिन्याभरापासून हे औषध नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.
-रुग्णांसाठी ‘डेफेरासिरॉक्स’ औषध महत्त्वाची
‘थॅलेसेमिया व सिकलसेल सोयसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी म्हणाले, ‘थॅलेसेमिया’ या आजारात रुग्णाच्या रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबीन तयार होत नाही. रुग्णास वारंवार रक्त द्यावे लागते. लाल पेशी नष्ट होत असल्याने अवयवांमध्ये लोहाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त जमा होते. यामुळे हृदय, यकृत, मूत्रपिंड व अंत:स्रावी प्रणालीचे नुकसान होण्याची भीती असते. लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी रोज एक ‘डेफेरासिरॉक्स’ औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांसाठी ही गोळी जीवनावश्यक आहे.
- ‘हाफकिन’कडून पुरवठाच नाही
सर्व शासकीय रुग्णालयांना औषधी व यंत्र सामग्रीची खरेदी व पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ‘हाफकिन’कडून या औषधांचा पुरवठाच झाला नसल्याने रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. स्थानिक पातळीवर या औषधाची किंमत शासकीय दरापेक्षा दुप्पट महाग आहे. यामुळे वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यास औषध खरेदी केली जाईल. परंतु, तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयात एक समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत काही औषधी खरेदी करण्याचा प्रयत्न आहे.
-सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे
सर्व शासकीय रुग्णालयात थॅलेसेमियाच्या रुग्णांना औषधींचा तुटवडा पडू नये यासाठी ‘थॅलेसेमिया व सिकलसेल सोयसायटी ऑफ इंडिया’ पाठपुरावा करीत आली आहे. आमच्याकडे येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधीही दिली जात आहे. परंतु, सर्वांनाच औषध देणे शक्य नाही. सरकारने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-डॉ. विंकी रुघवानी अध्यक्ष, ‘थॅलेसेमिया व सिकलसेल सोयसायटी ऑफ इंडिया’