मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे उद्घाटननागपूर : थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ केंद्राची घोषणा गेल्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. याचा पाठपुरावा केला जात आहे. या शिवाय थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास व अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.डॉ. विंकी रुघवानी चाईल्ड केअर सेंटर, जरीपटका येथील थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. विंकी रुघवानी व विकी कुकरेजा उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, थॅलेसेमिया व सिकलसेल हा रक्तजन्य व अनुवंशिक आजार आहे. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या हिवाळी अधिवेशनात या दोन्ही आजाराच्या उपचारासाठी उत्तर नागपुरात ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ची घोषणा करण्यात आली होती. याचा पाठपुरावा आ. मिलिंद माने करीत आहे. या सोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस.टी.मध्ये मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एस.टी. महामंडळाला १० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. या रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सवलती देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विवाहपूर्वी मुलामुलीची पत्रिका पाहिली जाते. परंतु पत्रिकेपेक्षा रक्ताची तपासणी करून थॅलेसेमिया व सिकलसेल असण्याची शक्यता पडताळून पाहिल्यास या आजारावर प्रतिबंध बसेल. सरकार याच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेईल. सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अस्थिमज्जा प्रतिरोपण हा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी रुग्णाचा नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या प्रतिरोपणासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून तीन लाखाची मदत केली जाईल. या कक्षामार्फत आतापर्यंत ५० वर मुलांच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आ. डॉ. माने म्हणाले, सिकलसेल या आजराच्या निर्मूलन हेतू राजकारणात आलो. उत्तर नागपुरात सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विवाहापूर्वी रक्ताची चाचणी करून निर्णय घेतल्यास हा आजार टाळता येण्यासारखा आहे. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. त्यांनी थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना येणाऱ्या समस्या मांडत शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मेयो व डागा रुग्णालयातून ‘कम्पोनंट’ रक्त दिले जात नसल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली. संचालन अॅड. वैशाली बागडे यांनी केले. आभार थॅलेसेमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उत्तर नागपुरात थॅलेसेमिया-सिकलसेलचे एक्सलन्स सेंटर
By admin | Published: January 11, 2016 2:48 AM