नागपूर : लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.
संविधान चौकात झालेल्या या प्रतीकात्मक आंदोलनात थाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यात आली. विकासाची थाळी पश्चिम महाराष्ट्राला आणि रिकामी थाळी विदर्भाला असे महाराष्ट्राचे धोरण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विदर्भातील सिंचनाच्या प्रश्नावर फक्त अर्धा मिनिट खर्च केला. सिंचन महामंडळ ही उदासीन व अनभिज्ञ आहेत. यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही विदर्भाच्या प्रश्नावर केवळ घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची केलेली घोषणा निव्वळ राजकीय स्वरूपाची आहे. विदर्भाच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपये अनुशेषासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात ॲड. अविनाश काळे, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरू, प्रकाश वैरागडे, भगवानदास राठी, दिलीप ठाकरे, मनोहर बुटी, मुकेश मासुरकर, बापू गवळी, मधुकर देशकर, मुन्ना महाजन आदींनी सहभाग घेतला.