नागपूर - कोट्यवधींचे सोने आणि लाखोंची रोकड लुटण्यासाठी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सराफा व्यापारी केतन बटूकभाई कामदार यांना धारदार चाकूने भोसकणाऱ्या अजय उर्फ बिट्टू राम समशेरिया (वय १९), अनिकेत उर्फ अन्नू मनोज बरोंडे, अंकित हरिराम बिरहा (वय १९, सर्व रा. ठक्करग्राम पाचपावली) या तिघांच्या आणि त्यांना या गुन्ह्याची टिप देणारे प्रज्वल राजू विजयकर (वय २३), त्याचा भाऊ श्रेयस (वय २०, दोघेही रा. बुद्धनगर) आणि कैलास राजूसिंग ठाकूर (वय २८, रा. वैशालीनगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले सोने, चांदी आणि रोकडही पोलिसांनी जप्त केली. पोलीस दलाच्या संयुक्त प्रयत्नातूनच झालेल्या उत्कृष्ट तपासाचा हे प्रकरण नमूना ठरले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत यासंबंधाने माहिती दिली. यावेळी सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी तसेच नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी दुपारी ३.५८ ला ही घटना घडली होती. त्याची माहिती पोलिसांना मिळताच सराफा व्यापाऱ्यांसह शहर पोलीस दलही हादरले. सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. लुटमारीची ही घटना पुढच्या काही तासांत आंदोलनाच्या रुपाने वातावरण चिघळवू शकते, अशी चर्चा सुरू झाली. पोलिसांकडे आरोपींचा कोणताच क्लू नव्हता. केवळ सीसीटीव्हीचाच आधार होता. त्यातीलच एक क्लिप शनिवारी रात्री पोलिसांच्या व्हॉटस्अप ग्रुपवर व्हायरल करण्यात आली. पाचपावलीतील पोलीस कर्मचारी अंकूश राठोड यांची नुकतीच एन्जिओग्राफी झाली असल्याने त्यांना डॉक्टरांनी भरपूर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी ही क्लीप बघताच आपण आरोपींना ओळखतो, असे वरिष्ठांना सांगून त्यांना पकडण्यासाठी धावपळ सुरू केली. तपासाचा हा टर्निंग पॉईंट ठरला. आरोपी अजय अनिकेत अन् अंकितची नावे कळताच पोलीस पथकांनी त्यांच्या घरी धडक दिली. कॉल डिटेल्समधून त्यांच्या संपर्कातील टिपरचाही पत्ता लागला. मुख्य आरोपी कामठीच्या रमानगर रेल्वेक्रॉसिंगकडे असल्याचे लक्षात येताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वायरलेसवर ‘जो कोणता पोलीस कर्मचारी सर्वप्रथम आरोपीला पकडेल, त्याला दोन लाखांचे रोख पुरस्कार दिला जाईल’, असा मेेसेज दिला. त्याने जादू केली. शहरातील सर्वच बिट मार्शल कामठीकडे धावले अन् त्यापैकी कुंदन नंदनवंशी, सुरेंद्र शेंद्रे, मनोज गजभिये तसेच रोहन वाघचाैरे या चाैघांनी आरोपी अजय अनिकेत अन् अंकितची येरखेडा परिसरात गचांडी धरली. त्यांच्याकडून लुटलेले सोने, चांदी अन् रोखही जप्त करण्यात आली.
२४ तासांच्या कर्तव्याला काैतुकाची ‘रोख’ थापया गुन्ह्याचा छडा तात्काळ लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त सारंग आवाड, उपायुक्त चिन्मय पंडित, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, उपायुक्त मनीष कलवानिया, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या नेतृत्वात पाचपावलीचे ठाणेदार संजय मेंढे, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, सीओसीचे राठोड, गुन्हे शाखेचे मयूर चाैरसिया, बलराम झाडोकर, कर्मचारी अंकूश राठोड, अहिर, प्रवीण रोडे, नरेंद्र ठाकूर, मतिन बागवान, सुधीर पवार, सुहास शिंगणे, रहमत शेख, हरिशचंद्र वालदे, विजयेंद्र यादव, विजय यादव, सुनील ठाकूर, नितीन वर्मा, ज्ञानेश्वर भोंगे, प्रकाश राजपल्लीवार, अमित सातपुते, रोशन फुकट, संजय बरेले, पवन भटकर, रमेश मेमनवार, इमरान खान, वासुदेव जयपुरकर, शहनवाज मिर्झा, रूपेश सहारे, गणेश ठाकरे, आशिष बावनकर, नितीन धकाते यांनी सलग २४ तास परिश्रम घेतले. त्यांना एकूण चार लाखांचे पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन पोलीस जिमखाण्यात एका कार्यक्रमात गाैरविण्यात आले.