नागपूर: दुरंतो एक्स्प्रेसने ‘गुपचूप’ मुंबईत पाठविलेल्या ‘त्या’ ६० लाख रुपयांच्या पार्सलने आता अनेक जण गोत्यात आले आहे. एकीकडे या प्रकरणाची प्राप्तिकर खात्याकडून चाैकशी सुरू आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी संबंधित कंत्राटदाराला १ लाखाचा दंड ठोठावला असून, पार्सल विभागाच्या अधिकाऱ्यांसह तिघांना कारवाईचा दणका दिला आहे. यामुळे पार्सल विभागात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
१६ एप्रिलला येथील पार्सल विभागातून अनेकांना बगल देऊन ६० लाखांची रोकड असलेले पार्सल दुरंतो एक्स्प्रेसमधून मुंबईला पाठविले होते. त्याची टीप मिळताच मुंबईत आरपीएफच्या पथकाने ही रोकड पकडली. प्राथमिक चाैकशीनंतर या प्रकरणाची चाैकशी प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणाची प्राथमिक चाैकशी केल्यानंतर रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. सूत्रांनुसार, पार्सल विभागाशी संबंधित कंत्राटदाराला या गैरप्रकाराबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, पार्सल विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्याची सोमवारी उचलबांगडी करण्यात आली. येथेच कार्यरत अन्य दोघांची विभागीय चाैकशी केली जात आहे. चाैकशीनंतर त्यांनाही कडक कारवाईचा दणका दिला जाणार असल्याचे सांगितले जाते.'लोकमत'च्या वृत्तामुळेच यंत्रणा अलर्टउल्लेखनीय म्हणजे, लोकमतने पार्सल विभागातील 'गोलमाल'ची पूर्व कल्पना देणारे वृत्त ‘लोकमत’ने २ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर, ६० लाख पकडण्यात आल्यानंतरही हे प्रकरण आक्रमकपणे लावून धरले होते. त्याचमुळे ठिकठिकाणच्या रेल्वेशी संबंधित तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.