विशाल महाकाळकर
नागपूर : जून महिना असला तरी उन्हाळ्याच्या झळा थांबलेल्या नसून दररोज पारा वर चढत आहे. बहुतेक शहरातील चोरांनादेखील याचा त्रास होत असावा. म्हणूनच की काय खामला रोडवर अज्ञात चोरांनी दोन दुकानातून चक्क १५ हजारांच्या आईसक्रीमची चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. आईसक्रीम लवकर वितळत असल्याने याची नेमकी त्यांनी विक्री केली की आपल्या घरी नेऊन त्याला ‘स्टोअर’ करून ठेवले आहे या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
दादा नामदेवराव शिंदे (५५) यांचे संताजी कॉलनी खामला रोड येथे दुकान आहे. ६ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले व ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता ते दुकानात गेले असता शटर बंद होते, मात्र बाजुचे कुलूप तुटले होते. आत गेल्यावर गल्ल्यातील ५ हजार रुपये व देवाजवळील काही पैसे गायब होते. त्यांनी अधिक पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. चोरट्यांनी पैशांसोबत चक्क १५ हजार रुपये किंमतीचे आईसक्रीमचे बॉक्सेसच चोरून नेले होते.
दुसरी घटना जवळीलच सावरकर नगर येथे घडली. रमेश खवले यांच्या डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन हजार रुपयांचे आईसक्रीम चोरून नेले. यासंबंधात शिंदे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार ऐकून पोलीसदेखील आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी गुुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे. परंतु चोरट्यांनादेखील गरमीमुळे आईसक्रीमची चटक लागली की काय अशीच चर्चा रंगली होती.