मुंबई - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. 4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होणार असल्याचा निर्णय कामकाज सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला आहे. 13 दिवस कामकाज चालणार आहे. तर चार दिवस सुट्या असणार आहेत.
या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने उपराजधानीत तयारी जोरात सुरू आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, राजभवन आदी परिसरात साफसफाई, स्वच्छता, सौंदर्यीकरणासह दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. सध्या विधानभवन परिसरात डागडुजी सुरू असून थोडीफार रंगरंगोटीही केली जात आहे. परिसरातील खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे आदी कामाला गती आली आहे. जूनच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.
विधिमंडळ सचिवालय २२ पासून नागपुरात४ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असले तरी विधिमंडळ सचिवालय मात्र अगोदरच दाखल होत असते. त्यानुसार मुंबईल विधिमंडळ सचिवालय २२ जूनपासून नागपुरात हलविण्यात येणार आहे. परंतु मुंबई मंत्रालयातील काही कर्मचारी मात्र नागपुरात दाखल झाले आहेत. उर्वरित कर्मचारी टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
बंदोबस्तासाठी ६२०० पोलीसअधिवेशन काळात बंदोबस्तासाठी राज्यभरातील ६२०० पोलीस अधिकारी-कर्मचारी शहरात दाखल होणार आहेत. या पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था मंगल कार्यालये, सरपंच भवन आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई मुख्यालयातून शहरात येणाऱ्या शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेतर्फे अतिरिक्त बोगीची व्यवस्था करण्यात येणार आहे.