लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : चार महिन्यांत चार खून, चोरी, दरोडेखोरांचा घरात शिरण्याचा प्रयत्न, सट्टा, जुगार, गुंडांच्या धमक्या, मारहाण आदींमुळे सुमारे वर्षभरापासून उमरेड परिसर चांगलेच हादरले आहे. असामाजिक तत्त्वांचा वाढता प्रभाव हा चिंता आणि चिंतनाचा विषय ठरत असून, उमरेडची गुन्हेगारी थांबवा, अशा आशयाची मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. आता बस्स झाले. पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आहेत, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी यावेळी नागरिकांना दिला.
अवैध दारू विक्री, जुगार, गांजा तस्करी आदी अवैध धंदे बंद करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले असल्याची बाबही त्यांनी पत्रकारांना सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
परिसरात बेरोजगारी चांगलीच वाढत आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. कोरोनाने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. अशावेळी कौटुंबिक हिंसाचारसुद्धा वाढला आहे. वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अन्यथा उमरेड अवैध धंद्यांचे ‘हब’ होईल, या गंभीर बाबींकडेही सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले. यावेळी जैबुन्निसा शेख, सुरेश झुरमुरे, बंडू शिंदे, शांताराम राऊत, चंद्रमणी पिल्लेवान, लीना झाडे, माधुरी रामटेके, बिल्कीस शेख, बापू लेदाडे, सोनू गणवीर, बलदेव नागदेवते, ताहेरा पठाण आदींची उपस्थिती होती.