ठळक मुद्देसाडेअकरा शिवलिंगांचे मंदीर
वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तमानातही जपण्याचा वसा कायम राखला आहे.देऊरवाडा म्हणजेच देवळांचा वाडा अर्थात देवांचा वाडा. या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर अनेक देवळे पहावयास मिळतात.या गावातील नागरिक आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत. कुठल्याही धर्मचा, जातीचा वा आर्थिक स्तराचा नागरिक असो, तो आपल्या घरावर त्याच्या ऐपतीनुसार छप्पर घालतो. मात्र त्यात कौलांचा समावेश कधीच नसतो.प्रथम ऐकताना अतिशय नवलाची वाटणारी ही बाब असली तरी त्याचे उगमस्थान हे पुराणकाळात दडले असल्याचे नंतर आख्यायिकेतून कळते.आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली हिरण्यकश्यपूची गोष्ट जर आठवली तर नरसिंहाने कसे त्याचे पोट फाडले हे आठवावे. तर त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार केल्यानंतर नरसिंहाने आताच्या देऊरवाडातून वाहणाऱ्या पूर्णा नदीत आपले हात धुतले होते असे सांगतात. त्याची ती रक्ताळलेली नखे ही कौलांसारखी दिसत होती. एका असुराचा नाश केलेली व रक्ताळलेली नखे आपल्या घरावर नको या भावनेमुळे तेथील गावकरी आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत.या गावात नरसिंहाचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. नदीच्या काळावर एका काठावर नरसिंहाचे तर दुसऱ्या काठावर साडेअकरा शिवलिंगांचे मंदिर आहे. ही शिवलिंगे याच नदीच्या पात्रातून बाहेर आल्याचे सांगितले जाते.पुराणकाळातील ही कथा आजच्या विज्ञानयुगात सुसंगत वाटणारी नसली तरी देऊरवाडातील नागरिक तिला मान्यता देतात. जर या आख्यायिकेला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या घरावर कौले लावलीच तर ते घर लवकरच भंगते, पडते वा त्या घरातील सदस्यांवर सतत अरिष्टे येतात अशीही वदंता आहे.चांदूरबाजार हा तालुका तसा अमरावती जिल्ह्यातील एक सधन तालुका. येथे पावसाचे प्रमाणही तुलनेत अधिक असते. सामान्यपणे जिथे पाऊस जास्त असतो तिथे कौलारू घरे अधिक पहावयास मिळतात. अपवाद फक्त एकच, अमरावती जिल्ह्यातले देऊरवाडा.