नागपूर : महाल परिसरात महापालिकेच्या टाऊन हाॅलच्या अगदी बाजूला ब्रिटिश वास्तूकलेचा नमुना असलेली राष्ट्रीय वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार आहे. १५० पेक्षा जास्त वर्षे जुनी ही वास्तू पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे.
या इमारतीमध्ये असलेल्या राष्ट्रीय वाचनालयाची स्थापना १८६३ मध्ये झाल्याचे नमूद आहे. म्हणजे इमारतीचे बांधकाम त्यापूर्वीचे आहे. याचा अर्थ वास्तूला जवळपास पावणे दाेनशे वर्षे झाली आहेत. इमारतीमध्ये पाेस्ट ऑफिस आणि रजिस्ट्री ऑफिसही आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचा थाेडा भाग काेसळला हाेता, त्यामुळे ती धाेकाग्रस्त इमारतीच्या श्रेणीत आली आहे. महापालिकेने वाचनालयासह येथे असलेली कार्यालये खाली करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती आहे.
ज्येष्ठ पुरातत्व अभ्यासक चंद्रशेखर गुप्त यांनी इमारत पाडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मनपाने चार महिन्यांपूर्वी वाचनालय, पाेस्ट ऑफिस व रजिस्ट्री ऑफिस खाली करण्यास सांगितले आहे. गुप्त यांच्या मते हा निर्णय याेग्य आहे. काेणताही अपघात हाेऊ नये. वाचनालय व डाकघर इतरत्र हलविले जाऊ शकतात. मात्र, पूर्ण इमारत पाडणे याेग्य नाही. ही इंग्रज काळातील इमारत असून, ब्रिटिश वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. मात्र, आता ही इमारत आपला वारसा आहे. ही वास्तू वारसा संवर्धन समितीच्या यादीत असून, इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे इमारत ताेडून प्रशासकीय इमारत, माॅल बनविण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन हाेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
ही वास्तू म्हणजे तिच्या स्वरुपातील एकमेव नमुना आहे. हळूहळू या शहरातील प्राचीन अवशेष नष्ट हाेत आहेत. मग काय निव्वळ काँक्रीटचे जंगल ठेवणार का, असा सवाल त्यांनी केला. वास्तूचा एका भाग ताेडला आहे; पण बाकी स्ट्रक्चर संवर्धित केली जाऊ शकते. पुन:निर्माणही हाेऊ शकते. भारतीय पुरातत्व विभाग अनेक वास्तूंचे संवर्धन केले आहे आणि नागपुरात विभागाची शाखा आहे. त्यामुळे या इमारतीत भाेसलेकालीन वैभव दर्शविणारे संग्रहालय तयार केले जाऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.