नागपूर : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून आता गुन्हेगारांनी ‘ऑनलाईन गेम’ खेळणाऱ्यांभोवतीदेखील जाळे फेकण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका प्रकरणात अज्ञात आरोपींनी शहरातील एका महिला युट्यूबरच्या अवघ्या ९ वर्षीय मुलाला ‘ऑनलाईन गेम’च्या नावाखाली ‘टार्गेट’ केले. त्याचे त्याच्या लहान बहिणीसह अपहरण करण्याची धमकी देत त्याच्या आईच्या मोबाईलमधून १ लाखांहून अधिक रक्कम पाठविण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे पोलीसदेखील अचंबित झाले आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अल्फिया नदीम शेख (३३) या ‘युट्यूबर’ असून त्यांना ९ वर्षाचा मुलगा व दीड वर्षांची मुलगी आहे. अभ्यासातून फावला वेळ मिळाल्यावर त्यांचा मुलगा त्यांच्या मोबाईलवर ‘फ्री फायर’ हा ‘ऑनलाईन गेम’ खेळतो. या ‘गेम’मध्ये इतर जणदेखील ऑनलाईन माध्यमातूनच जुळतात. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात गेममध्ये एस.के.भाईजान, प्रमोद कालू, अक्षद व दीपक बोरा हेदेखील ‘जॉईन’ झाले. त्यांनी ९ वर्षीय मुलाशी चॅटिंग केली व घरी कोण कोण आहे व घरचे काय करतात याची माहिती काढून घेतली. त्यांनी बोलता बोलता त्याला आईच्या गुगल पेचा ‘पिन’ पाहण्यास व तो पाठविण्यास सांगितले. अजाणत्या मुलाने तसेच केले.
दरम्यान आरोपींनी त्याला अपहरणाच्या नावाखाली घाबरविण्यास सुरुवात केली. तुला व तुझ्या बहिणीला आम्ही उचलून नेऊ असे आरोपींनी त्याला म्हटले व तो घाबरला. आरोपींनी त्याला पैसे कसे पाठवायचे हे सांगितले व त्याच्या आईच्या मोबाईलवरून २० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत १ लाख २ हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करवून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर अल्फिया यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कोराडी पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.