नागपूर : चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तिला महिन्याला ४० किलाे आणि संपूर्ण कुटुंबाला २०० किलाेच्यावर लाकडे लागतात. यातून माेठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हाेते. दुसरीकडे उघडे पडून असलेल्या गाई-म्हशीच्या शेणातूनही घातक मिथेन गॅसचे उत्सर्जन हाेते. त्यापेक्षा स्वयंपाकासाठी बाॅयाेगॅसचा वापर केल्यास कार्बन, मिथेनचे उत्सर्जन राेखता येऊ शकते. त्यामुळे बाॅयाेगॅसच्या वापरातून हवामान बदलाचे धाेके कमी करण्याची क्षमता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
युवा रूरल असाेसिएशन आणि इन्फाेसिस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सरपंच भवन येथे ‘क्लायमेट मिटीगेशन’ परिषदेचे आयाेजन करण्यात आले. युवा रूरलचे महासंचालक दत्ता पाटील म्हणाले की, हवामान बदलामुळे तापमान वाढ, अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस व इतर आपत्ती येण्यासारखे धाेके वाढले आहेत. पाणी संवर्धनाबाबत उदासीनतेमुळे भूजल आणि जमिनीवरचे पाणीही कमी हाेत आहे. जंगलाचा ऱ्हास होत चालला आहे. वायू प्रदूषणामुळे जल, जंगल, जमीन या तिन्ही घटकांवर गंभीर परिणाम हाेत आहेत. हवामान बदलाचा धाेका आता थांबविता येत नाही. पण, थाेड्या प्रयत्नाने ताे कमी नक्कीच करता येऊ शकताे. बायाेगॅसचा वापर वाढविणे हा चांगला पर्याय ठरू शकताे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
असाेसिएशनचे प्रकल्प समन्वयक नावेद खान यांनी सांगितले, इन्फाेसिसच्या मदतीने युवा रुरलद्वारे नागपूरच्या रामटेक, माैदा, सावनेर, पारशिवनी तसेच भंडाराच्या तुमसर व माेहाडी या सहा ब्लाॅकमध्ये १२००० बाॅयाेगॅस संयत्र नि:शुल्क लावण्याचा उपक्रम राबविला जात असून त्यातील १० हजार संयत्र बसविण्यात आले आहेत. डीआरडीए (विकास)चे उपविभागीय आयुक्त विवेक ईलमे यांनी शासनाकडून एवढे बायाेगॅस संयत्र लावण्याची क्षमता नसल्याने एनजीओच्या या उपक्रमाचे काैतुक केले. कार्यक्रमात इन्फाेसिसचे सेवाप्रमुख धनवंत नारायणस्वामी, एनजीओच्या संचालक ज्याेती नगरकर प्रामुख्याने उपस्थित हाेते.