नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले. मोक्का प्रकरणातील एक आरोपी आरोग्याच्या समस्येमुळे बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच डॉक्टरकडे नेण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली. परिणामी, तो आरोपी बराच वेळ खाली पडून राहिला. दरम्यान, न्यायाधीश जे. पी. झपाटे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित आरोपीला रुग्णालयात भरती करण्याचे निर्देश दिले.
विजय रहांगडाले, असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. पोलिसांनी रहांगडाले याला न्या. झपाटे यांच्या न्यायपीठासमक्ष पेशीसाठी आणले होते. दरम्यान, तो न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत बाहेरील बाकावर बसला होता. काही वेळानंतर त्याच्या तोंडाला फेस आला व तो भोवळ येऊन खाली कोसळला. तो बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ खाली पडून राहिला. आजूबाजूचे पोलीस केवळ त्याच्याकडे पाहत राहिले. पोलिसांनी डॉक्टरला बोलविण्याकरिता काहीच हालचाल केली नाही.
त्यामुळे तेथील दक्ष वकिलांनी ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीशांनी माहितीची सत्यता पडताळल्यानंतर पोलिसांना बोलावून रहांगडालेला वैद्यकीय उपचाराकरिता तातडीने रुग्णालयात भरती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रहांगडालेला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले व त्याच्या पत्नीलाही बोलावून घेण्यात आले. ही घटना न्यायालयात दिवसभर चर्चेत होती.