नागपूर : प्रवासी घेण्यासाठी गेलेल्या एका कॅब चालकाला चार ते पाच ऑटोचालकांनी बेदम मारहाण केली. त्याचे तोंड फोडले. पोलिसांनी मात्र आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी 'अदखलपात्र' (एनसी) नोंद करून जखमी कॅबचालकाच्या हातात समजपत्र देऊन त्याच्या तोंडाला पाने पुसली.
पंकज ढवळे असे जखमी कॅब चालकाचे नाव आहे. रेल्वे स्थानकावरून कॉल आल्यामुळे तो आज सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दारासमोर रस्त्यावर पोहचला. प्रवासी कॅबमध्ये बसवत असल्याचे पाहून आरोपी अल्ताफ अंसारी आणि त्याचे साथीदार पंकजवर धावून आले. त्यांनी येथे आम्ही (ऑटोवाले) असताना तू प्रवासी घ्यायला आलाच कसा, असा प्रश्न करून त्याच्याशी वाद घातला आणि त्याला ठोसे तसेच लाथा मारल्या. डोळ्याखाली आणि नाकावर ठोसे लगावल्यामुळे पंकजच्या नाकातोंडातून रक्त निघू लागले. बाजूची मंडळी धावून आली आणि आरोपींच्या तावडीतून त्याला सोडवले.
त्यानंतर पंकज सीताबर्डी ठाण्यात पोहचला. त्याच्या नाकातोंडाला रक्त लागले होते. त्याचा डोळ्याखालचा भाग सूजला होता. पोलिसांनी पंकजची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याऐवजी आणि आरोपींवर कारवाई करण्याऐवजी ही 'गंभीर स्वरूपाची मारहाण बेदखल' ठरवली. तक्रारीची कलम ३२३, ५०४ ची नोंद करत पंकजच्या हाती 'एनसी' दिली.व्हिडीओ व्हायरल, प्रश्न उपस्थित
पंकजला गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याने त्याचे तोंड फुटलेल्या आणि कपडे फाटलेल्या अवस्थेतील व्हिडीओ एकाने काढला. पोलिसांनी गुन्हेगारांना पाठीशी घालत हे प्रकरण एनसी केल्यामुळे व्यथित झालेल्या पंकजने काही पत्रकारांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर हा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. तो पाहता पोलिसांनी या प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्याचे का टाळले, असा संतप्त प्रश्न चर्चेला आला. याचमुळे उपराजधानीतील गुन्हेगार निर्ढावत आहेत, अशीही चर्चा सुरू झाली.ऑटोचालक- पोलिसांचे संबंध
शहरातील आणि खास करून सीताबर्डीतील ऑटोचालकांसोबत पोलिसांचे असलेले मधूर संबंध सर्वत्र चर्चेत आहे. सीताबर्डीतील, रेल्वे स्थानक परिसरातील अनेक ऑटोचालक गुन्हेगार स्वरूपाचे आहेत. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार, खंडणी वसुली आणि हत्येसारखे गंभीर गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ते कमालीचे निर्ढावले आहेत. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या बाजुला उभे राहून ते महिला-मुलींना आडवे-आडवे होतात आणि आपल्या ऑटोत बसविण्याचा प्रयत्न करतात. या संबंधाने नेहमी ओरडही होते. मात्र, ऑटोचालकावर ठोस कारवाई होत नाही.