नागपूर: सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना पकडण्यात अखेर रेल्वे (जीआरपी) पोलिसांनी यश मिळवले. राजू महादेव मायनेकर (रा. झेंडा चाैक, नागपूर) आणि दिनेश प्रभाकर झोटिंग (रा. तकिया झोपडपट्टी, नागपूर) अशी त्यांची नावे आहे. त्यांनी २००३ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.
गेल्या १९ वर्षांत वारंवार कोर्टात हजर राहण्यासंबंधी सूचना, आदेश देऊनही आरोपी दाद देत नसल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा काशीद यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्यांना अटक करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींची बारीकसारीक माहिती काढून त्यांच्यावर पाळत ठेवली आणि बुधवारी दुपारी १ वाजता या दोघांनाही तकिया भागातून अटक केली.आरपीएफच्या जवानाला केली होती मारहाण -या दोघांनी २००३ मध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या जवानासोबत वाद घालून त्याला मारहाण केली होती. दरम्यान, त्यांना अटक करण्याची कामगिरी ठाणेदार मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार ऋषिकांत राखुंडे, शिपाई बबलू वरठी, दीपक सेलोटे, सुदाम सोळंकी, तुषार रांजनकर यांनी बजावली.