नागपूर : इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदवायची आहे. आधार नोंदणी संच मान्यतेसाठी गृहीत धरली जाणार आहे. मात्र, पोर्टलने जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३७ हजार ९४६ विद्यार्थ्यांच्या आधार नोंदी इनव्हॅलिड ठरविल्या आहेत. या इनव्हॅलिड नोंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याने शिक्षकांची झोप उडाली आहे.
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. परंतु वारंवार मुदतवाढ देऊनही काही खासगी शाळांसोबतच अनुदानप्राप्त शाळांच्या प्रतिसादाअभावी जिल्हा आधार नोंदणीमध्ये राज्यात माघारलेला आहे.
जिल्ह्यामध्ये २०२१-२२ च्या युडायस आकडेवारीनुसार ४०६३ शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १५१८, महापालिकेच्या १३४, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत ६४, कायम विनाअनुदानित ५४, मदरसे ३६, खासगी विनाअनुदानित २२६, केंद्रीय विद्यालयाच्या ६, खासगी अनुदानित १०४४ आदी शाळांचा समावेश आहे. १,३७९४६ आधार कार्ड अपडेट नसल्याने कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
...तर शिक्षकांची पदे घटणार
जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या शाळांतील एकूण ८,३३,८९० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ८,१९,७६२ जणांकडे आधार कार्ड आहे. तर १४ हजार १२८ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. युडीआयडीकडून ७,७८,५६७ विद्यार्थ्यांचे आधार तपासले. त्यापैकी ६,८१,८१६ आधार व्हॅलिड ठरलेत. ९६,७५१ आधार इनव्हॅलिड ठरलेत. ४१,१९५ आधार शाळा स्तरावर पेंडिग असल्याचे राज्याच्या अहवालातून पुढे आले. तर जिल्ह्यात एकूण १३७९४६ आधार कार्ड अपडेट नाहीत. कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्यात नागपूर ३१ व्या क्रमांकावर
राज्यातील १८ महापालिकांपैकी नागपूर मनपा आधार नोंदणीत दहाव्या क्रमांकावर असून ७७.३० टक्के नोंदणी आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांचे काम ९१.५६ टक्के झाले असून त्या राज्यातील नगरपालिकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या तुलनेत नागपूर जि.प.चे ९२.७९ टक्के काम पूर्ण झाले असून, राज्यात ५ व्या क्रमांकावर आहे. तर जिल्ह्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित, खासगी शाळांचे काम ८६.९१ टक्के झाले असून, या संवर्गात नागपूर जिल्हा राज्यात ३१ व्या क्रमांकावर आहे.