नागपूर : पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीवर सळाखीने वार करून तिला संपविल्याची घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २५ जूनला रात्री ८.३५ ते ९.१० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे आरोपी आणि मृतक महिलेचा दोन वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.
मन्नत उर्फ मिनू दिलप्रित कौर विर्क (२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलप्रित उर्फ विक्की कुलविंदरसिंग विर्क (३०, रा. पंचमवेद्य आर्य सोसायटी, दिक्षीतनगरजवळ, कपिलनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघांचाही २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता. त्यांना एक २ वर्षांचा मुलगाही आहे. आरोपी दिलप्रितचे चारचाकी वाहनांच्या अॅसेसरीज व स्पेअर पार्टचे दुकान आहे. मन्नतचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी दिलप्रितला सदर परिसरात मन्नत एका युवकासोबत फिरताना आढळली. त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी (२०, रा. हुडको कॉलनी जरीपटका) याला फोन करून मन्नतसोबत घटस्फोट घ्यायचा असून त्याबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपी दिलप्रितचा मन्नतसोबत मंगळवारी रात्री तिच्या प्रेमसंबंधावरून पुन्हा वाद झाला.
रागाच्या भरात दिलप्रितने लोखंडी सळाखीने मन्नतच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. त्यानंतर आरोपी दिलप्रित घराला कुलुप लाऊन निघून गेला. इकडे मन्नतचा भाऊ आणि तिच्या मेत्रीणीने मन्नतशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नतच्या घराचे दार तोडून आत बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मन्नतचा भाऊ विशालने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रितविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
घटनेच्या वेळी चिमुकला होता आजीकडेमन्नत आणि आरोपी दिलप्रितला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. परंतु घटनेच्या वेळी हा चिमुकला आरोपी दिलप्रितच्या आईकडे होता. आईचा खून झाला आणि वडिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हा चिमुकला पोरका झाला आहे.
पोलिसांचा हलगर्जीपणा भोवलाघटनेपूर्वी अनेकदा मन्नत आणि दिलप्रित यांचा वाद कपिलनगर आणि जरीपटका पोलिस ठाण्यात गेला होता. दोघांनीही ऐकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. एवढेच काय तर घटनेच्या एक दिवस आधी मन्नत आणि तिचा भाऊ विशाल हे कपिलनगर ठाण्यात गेले होते. तेथे त्यांनी दिलप्रितपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. परंतु अनेकदा वादाच्या तक्रारी होऊनही जरीपटका व कपिलनगर पोलिसांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली नाही आणि मन्नतला आपल्या जीवाला मुकावे लागले.