विशाल महाकाळकर
नागपूर : हायवेवर रात्रीला होणाऱ्या अपघातांची कारणमीमांसा केल्यावर लक्षात येते की, बहुतांश अपघातात चालकाला झोप लागली, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. अपघातापूर्वीच चालकाला झोप लागत असल्याचा अलर्ट मिळाल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी करण्यास मदत होईल. हा अलर्ट देणारे 'ॲन्टी स्लीप अलार्म' (anti sleep alarm) डिव्हाईस असून नागपुरातील एका युवकाने याचे संशोधन केले आहे.
गौरव सव्वालाखे असे या युवकाचे नाव आहे. हे डिव्हाईस इअर मशीनसारखे आहे. वाहन चालविताना कानाच्या मागल्या भागाला लावले जाते. या डिव्हाईसमध्ये त्याने एक सेन्सर लावले आहे. सोबतच ३.६ व्होल्टची बॅटरी व ऑन ऑफ स्वीच आहे. हे डिव्हाईस लावून गाडी चालवत असाल आणि तुम्हाला डुलकी लागली व तुमचे डोके ३० डिग्रीपर्यंत स्टेअरिंगच्या दिशेकडे खाली आले की डिव्हाईसमधून ८५ डेसिबल आवाजाचा अलार्म वाजायला लागतो. अलार्म वाजला की चालक लगेच अलर्ट होतो. कदाचित पुढचा धोका टाळू शकतो.
- अलार्म बरोबर व्हायब्रेट ही होणार
रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. सध्या हे डिव्हाईस अलार्म देत आहे. यात काही बदल करून पुढे व्हायब्रेटरही होणार आहे. त्यामुळे आवाजाबरोबर शरीराला सुद्धा अलर्ट मिळणार आहे.
- नागपूर ते नेपाल कारने प्रवास करताना रात्रीला डुलकी लागल्याचे प्रसंग माझ्यासोबत घडले. तेव्हा विचार केला की झोप लागण्याचा अलर्ट देणारे यंत्र तयार करावे. तेव्हापासून त्यावर काम सुरू केले आणि ही ॲण्टी अलार्म मशीन तयार केली. सध्य मी याचा नाईट ड्राईव्ह करताना उपयोग करतो.
गौरव सव्वालाखे, संशोधक