नागपूर : आंब्याला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. परिणामी, नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. सर्वाधिक विक्रीच्या बैगनपल्ली आंब्याचे १२५ ट्रक दरदिवशी विक्रीसाठी येत आहेत. भाव दर्जानुसार ३० ते ४५ रुपये किलो आहे. मात्र, किरकोळमध्ये दुप्पट, तिप्पट भावात विक्री होत आहे.
मध्यंतरी आलेल्या पावसामुळे आंब्याची चव आणि दर्जा उत्तम नाही. दुसरीकडे उत्पादन वाढल्याने माल विक्रीसाठी जास्त प्रमाणात येत आहे. भाव गेल्यावर्षीप्रमाणेच आहेत. यंदा आवक ३० जूनपर्यंत राहील, मात्र १५ जूननंतर कमी होईल. आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यातून बैगनपल्ली आंब्याचे ५ ते ७ टन क्षमतेचे ११० ते १२५ ट्रक विक्रीसाठी येत आहेत.
मुंबईतून येताहेत हापूसचे ३०० डब्बेकळमन्यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मुंबईहून डझन पॅकिंगचे दररोज ३०० डब्बे येत असून ६०० ते ८०० रुपये डझन भाव आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशाच्या हापूस आंब्याच्या २०० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) येत असून ८० ते १०० रुपये भाव आहे. हा आंबा चवीला गोड आहे.
लंगडा, दशेरी, तोतापल्ली, केशरची विक्री वाढली
कळमन्यात स्थानिक उत्पादकांकडून लंगडा, दशेरी आणि केशर आंबे विक्रीला येत आहेत. भिवापूर, मांढळ, कोहमारा, गोंदिया, मौदा या भागातून लंगडा आंब्याचे ३० ते ४० टेम्पो (प्रति टेम्पो १ टन) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रति किलो ३० ते ६० रुपयांवर आहेत. दशेरी नागपूर जिल्ह्याच्या विविध भागातून कळमन्यात येत आहे. या आंब्याचेही भाव ३० ते ६० रुपये किलो आहे. शिवाय स्थानिकांकडून केशर आंब्याच्या २०० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) दररोज येत आहेत. ५० ते ६० रुपये भाव आहे. तसेच गुजरात राज्यातून केशर आंब्याचे १० किलो पॅकिंगचे ३०० बॉक्स विक्रीला येत असून भाव ७० ते ९० रुपयांदरम्यान आहेत. आंध्रदेशच्या तोतापल्ली आंब्याचे भाव दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो आहेत. नीलम आंब्याची आवक पावसाळयात होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.कळमना फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, मतमोजणीच्या काळात कळमन्यातील फळ बाजारावर अतिक्रमण नकोच. या बाजारातील लिलावाचे हॉल क्र. ३, ४, ५ प्रशासनाने मतमोजणीसाठी ताब्यात घेतले आहेत. २० मेनंतर व्यापाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने फळांच्या लिलावासाठी रस्त्यावर मंडप टाकले आहेत. प्रशासनाने मतमोजणी शहराबाहेर वा मानकापूर येथील इंडोअर स्टेडियममध्ये घ्यावी.
सर्वाधिक बैगनपल्लीची विक्रीकळमना बाजारात अनेक वर्षांपासून बैगनपल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी असते. त्या खालोखाल केशर, लंगडा, दशेरी, गावरान आंब्याची विक्री होते. रत्नागिरीचा हापूस महाग असल्याने त्याचे ग्राहकही कमी आहेत. गुजरातचा केशर आणि आंध्रप्रदेशच्या हापूस आंब्याची चांगली मागणी आहे. १५ जूनपर्यंत आवक राहील.आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे अडतिया असोसिएशन.