सुमेध वाघमारे
नागपूर : नागपूर शहराच्या खरबी भागातील ३२ वर्षीय महिलेने एका रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म दिला. त्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने दूध पाजले. नातेवाइकाने बाळाला पाळण्यात ठेवले. अर्ध्या तासानंतर परिचारिकेने बाळाला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बाळ ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ म्हणजे ‘कॉट डेथ’चा बळी पडले होते. आई आजही मानसिक धक्क्यात आहे.
खरबी रोडवरील अनिता (नाव बदलेले आहे) दुसऱ्यांदा आई होणार होती. पहिल्या बाळंतपणाचा अनुभव पाठीशी असल्याने तिने आवश्यक सर्व खबरदारी घेतली होत्या. ९ महिने पूर्ण झाल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सीझर झाले. अनिताने साडेतीन किलोच्या बाळाला जन्म दिला. कुटुंबासाठी तो दिवस आनंदाचा होता. अनिता अर्धवट शुद्धीवरच होती. परंतु, परिचारिका व महिला नातेवाइकाच्या मदतीने तिने त्या दिवशी पाच ते सहा वेळा बाळाला दूध पाजले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता अनिताने परिचारिकेच्या मदतीन बाळाला दूध पाजले. बाळ आईच्या बेडजवळील पाळण्यात ठेवण्यात आले. अर्ध्या तासाने बाळाला पहिले इंजेक्शन देण्यासाठी परिचारिका आली. तिने बाळाला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, निपचित अवस्थेत पडले होते. तिने बाळाला हातात घेत डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी बाळाला तपासून इमर्जन्सी उपचाराला सुरुवात केली. परंतु, सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला दिली. इकडे अनिता आता बाळ येईल, नंतर येईल या प्रतीक्षेत पलंगावर बसून होती. नंतर कुटुंबीयांनी तिची समजूत काढत बाळाच्या मृत्यूची माहिती दिली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. आज या घटनेला चार महिने झाले. परंतु, ती या धक्क्यातून सावरली नाही.
-शवविच्छेदनाच्या अहवालात बाळाचा गुदमरून मृत्यू
मेयो रुग्णालयात या बाळावर शवविच्छेदन झाले. त्याच्या श्वसननलिकेत दूध आढळून आले. बाळाचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला.
-‘कॉट डेथ’चा धोका कमी करता येऊ शकतो
बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेश अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, दुर्दैवाने ‘कॉट डेथ’ टाळण्याचा कोणताही मार्ग नाही. परंतु, धोका कमी करण्यासाठी विशेषत: नातेवाइकांनी काही गोष्टी शिकायला हव्यात. मातेने बाळाला दूध पाजण्यात नातेवाइकांनी मदत करावी. दूध पाजल्यावर वडिलांनी किंवा इतर नातेवाइकांनी किमान १० मिनिटे बाळाला उचलून धरायला हवे. बाळाला आईपासून वेगळे परंतु जवळ पाळण्यात ठेवायला हवे. त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेषत: रात्रीच्या वेळी एक तरुण नातेवाईक असायला हवा.
-पाठीवर झोपवल्यास बाळ गुदमरत नाही
सुदृढ बाळाला पाठीवर झोपवल्यास ते गुदमरत नाही. बाळाची काळजी घेण्यात मदत करणाऱ्यांनी बाळाला त्याच्या पाठीवर झोपवत असल्याची खात्री करायला हवी. जर मध्यरात्री उठल्यावर आणि बाळ पोटावर वळले असल्याचे दिसल्यास त्याला हळूवारपणे त्याच्या पाठीवर ठेवायला हवे. पाळण्यात बाळ ठेवताना त्याच्यासोबत इतर कुठल्याही वस्तू ठेवू नयेत. बाळाला आई-वडिलांच्या मध्ये झोपवू नये.
-डॉ. राजेश अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ.