नागपूर : केंद्रीय पर्यटन विभागात महासंचालक असल्याची बतावणी करत नागपुरातील गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठकबाजाला अखेर बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (विश्वेश्वरगंज, वाराणसी) याला उत्तर प्रदेशमधील लखनऊमधून अटक केली. होशिंगने गुंतवणूक योजनांबाबत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बॉलिवूड कलाकारांचे नाव असलेल्या पत्रिका त्याने तयार केल्या होत्या.
सुनील वसंतराव कुहीकर (जयताळा) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. अनिरुद्धने यवतमाळ व नागपुरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क केला व तो केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर या पदावर अधिकारी असल्याची बतावणी केली. त्याने पर्यटन विभागात गुंतवणुकीच्या काही योजना असल्याची थाप मारली व चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
त्याने गुंतवणूकदारांना काही बनावट पत्रिकांचे वाटप केले. त्यात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेशमधील मंत्री यांच्यासह बॉलिवूडमधील कलाकारांची नावेदेखील नमूद होती. त्याच्यावर विश्वास ठेवून कुहीकर यांच्यासह यवतमाळ येथील मीरा फडणीस, नागपुरातील मोहब्बतसिंह बावा, सुभाष मंगतानी यांनी ४८.८५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, त्याने कुठलाही आर्थिक परतावा दिला नाही. कुहीकर यांनी चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यांनी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी होशिंगविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून होशिंग लखनऊमध्ये असल्याची बाब समोर आली. नागपूर पोलिसांच्या पथकाने लखनऊमध्ये जाऊन सापळा रचला व त्याला अटक केली.
फसवणुकीच्या पैशांतून ८० लाखांची बीएमडब्ल्यू
आरोपी होशिंगने फसवणुकीच्या पैशांतून ८० लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू कार विकत घेतली होती. त्याने तो गुंतवणूकदारांवर ‘शायनिंग’ मारायचा व फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये मीटिंग करायचा. पोलिसांनी त्याच्याकडून ती बीएमडब्ल्यूही जप्त केली आहे.