कमलेश वानखेडे
नागपूर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी युतीसाठी दिलेला प्रस्ताव बहुजन समाज पक्षाने धुडकावला आहे. २०१९ मध्ये वरळीतून राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानसभा लढलेल्या माने यांना एकाएकी आंबेडकरी राजकारणाचा पुळका कसा येतो, असा सवाल करीत त्यांना युतीचा प्रस्ताव द्यायचाच असेल, तर आधी राष्ट्रवादीला द्यावा, असा सल्लाही बसपाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी दिला आहे.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा विदर्भ प्रदेश मेळावा बुधवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी आंबेडकरी चळवळीचे व्यापक हित लक्षात घेऊन बीआरएसपी, वंचित आघाडी व बसपाने एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्या, असे आवाहन केले. असे झाले तर आंबेडकरी चळवळीची ताकद वाढेल व सत्तेची चाबीही हाती येईल, अशी कारणमीमांसाही त्यांनी केली होती. मात्र, ॲड. माने यांच्या या आवाहनाला बसपाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. ताजने यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
ॲड. ताजने म्हणाले, बसपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. कुणाशीही युती न करता गेल्या अनेक वर्षांपासून विविध महापालिकेत बसपाचे नगरसेवक विजयी होत आहेत. ज्यांना सोबत यायची इच्छाच असेल, तर त्यांनी हत्तीच्या तिकिटावर लढावे. संख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्याची बसपाची तयारी आहे. ॲड. माने यांना आंबेडकरी चळवळीचा कळवळा असता, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने निवडणूक लढविली नसती. आता बसपाचा आधार घेऊन आपल्याला वाढता येईल, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.