आशीष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २०२३ मध्ये इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन एकट्याच्या भरवशावर करणे सोपे नाही. कारण इतक्या मोठ्या आयोजनासाठी खर्च करायला विद्यापीठाकडे निधी नाही. या आयोजनावर जवळपास १०० कोटी रुपयापेक्षा अधिकचा खर्च येण्याची शक्यता आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार ११ व १२ जुलै रोजी इंडियन सायन्स कॉंग्रेसची एक चमू विद्यापीठाच्या दौऱ्यावर आली होती. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. विजया लक्ष्मी सक्सेना यांच्या नेतृत्वातील या चमूनेसुद्धा इतके मोठे आयोजन कसे करणार? हाच प्रश्न विद्यापीठासमोर उपस्थित केला होता. सूत्रांनुसार विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीपूर्वी इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या चमूने विद्यापीठ परिसर, मुख्य प्रशासकीय परिसर (नवीन), मुख्य प्रशासकीय परिसर (जुना), विद्यापीठ क्रीडा संकुल, एलआयटी व इतर स्थळांचा दौरा केला. बैठकीत आयएससीच्या आयोजनासााठी निधीबाबतही चर्चा झाली. उद्घाटन समारंभापासून निरोप समारंभापर्यंतच्या आयोजनासाठी इतकी मोठी जागासुद्धा नाही. या आयोजनात देश-विदेशातून १५ ते २० हजार प्रतिनिधी सहभागी होतील. त्यांच्या राहण्या-खाण्यापासून प्रवास व इतर सुविधांवरही चर्चा झाली.
आयएससीची चमू दौऱ्यानंतर समाधानकारक असल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. चमू गेल्यानंतर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी एक समिती गठित केली आहे. समितीला पूर्ण आयोजनाशी संबंधित जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूत्रानुसार फंडिंगबाबत विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विज्ञान व प्रौद्योगिकी विभाग व विद्यापीठ केंद्रीय एजन्सी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळण्यासाठी मोठी अपेक्षा आहे. महाविद्यालयांकडूनही निधी संकलन करण्याची योजना आखली जात आहे. इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या देश- विदेशातील प्रतिनिधींना शून्य ते पंचतारांकित हॉटेल, एमएलए हॉस्टेल, विद्यापीठाचे अतिथी गृह, इतर शासकीय विश्राम गृह, इतर विश्रामगृहासह महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली जाईल. महाविद्यालयाची वसतिगृहे अधिग्रहित करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपासून केली जाईल. येथील विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था कुठे होईल हे सध्या ठरलेले नाही.
पंतप्रधान करणार उद्घाटन, राष्ट्रपतींनाही बोलावण्याची तयारी
सूत्रानुसार परंपरेप्रमाणे इंडियन सायन्स कॉंग्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. समारोपीय समारंभासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्याची तयारी केली जात आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी ही परंपरा सुरू केली असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही परंपरा कायम ठेवायची की नाही, यावर सध्या अंतिम निर्णय झालेला नाही.