'भारताचा झेंडा लावून हंगेरीकडे बस निघाली अन् मन उचंबळून आलं'; युक्रेनवरून परतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:00 AM2022-03-01T07:00:00+5:302022-03-01T07:00:03+5:30
Nagpur News भारताचा झेंडा लावून आमची बस निघाली, तो ध्वज पाहिला अन् मन उचंबळून आलं...! ही प्रतिक्रिया आहे युक्रेनवरून परतलेल्या भाग्यश्री कापसे या विद्यार्थिनीची!
गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : आम्ही युक्रेनमधील उझोरडमध्ये शिकतो. युद्ध पेटले आणि क्षणात सारे वातावरणच बदलले. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ९०० किलोमीटरवर बॉम्ब पडत होते. आम्ही सारे धास्तावलेले होतो. अशातच भारतात परत जाण्याची व्यवस्था झाली. युनिव्हर्सिटीच्या बसने हंगेरीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचवले. भारताचा झेंडा लावून आमची बस निघाली, तो ध्वज पाहिला अन् मन उचंबळून आलं...! ही प्रतिक्रिया आहे युक्रेनवरून परतलेल्या भाग्यश्री कापसे या विद्यार्थिनीची!
सोमवारी सकाळी १२.१० वाजता विमानाने भाग्यश्री आणि स्वप्नील देवगडे या विद्यार्थ्यांचे नागपुरात आगमन झाले, तेव्हा 'लोकमत'शी बोलताना ते भावुक झाले होते. या दोघांनीही भारतात सुखरूप पोहोचविल्याबद्दल आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनकडून आपुलकीच्या भावनेने झालेल्या स्वागताबद्दल त्यांनी देशाचे आभार मानले.
हे दोन्ही विद्यार्थी युक्रेनमधील उझोरड नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. भाग्यश्री तिथे तीन महिन्यांपूर्वी शिकायला गेलेली, तर स्वप्नील अगदी मागच्या महिन्यात १९ जानेवारीला गेलेला. या दोघांनाही तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल फारशी माहिती नव्हती. अभ्यासात जेमतेम मन रमत असतानाच, युद्धस्थिती निर्माण झाली. भाग्यश्री म्हणाली, उजुग्रोनला परिस्थिती तशी चांगली होती, मात्र कीव शहरात बॉम्ब पडणे सुरू झाले. परिस्थिती बरीच चिघळली. त्यामुळे आम्ही मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परतणारी आमची पहिली बॅच होती, मात्र तिकीट कन्फर्म झाल्यावर सर्व एअरलाईन्स बंद पडल्या. आमची फ्लाईटसुद्धा रद्द झाली. परंतु २६ फेब्रुवारीला आमची एनएमएलसीच्या माध्यमातून तिथून निघण्याची व्यवस्था करण्यात आली. युनिव्हर्सिटीच्या बसनेच आम्हाला हंगेरीच्या बॉर्डरपर्यंत नेऊन सोडले.
स्वप्नील म्हणाला, अजूनही किमान दहा हजारांवर विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरू आहेत. मात्र आता परिस्थिती बरीच चिघळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हीसुद्धा प्रचंड धास्तावलो होतो. मात्र सर्वांकडून धीर मिळत होता. घरुनही संपर्क होत असल्याने धोक्याची जाणीव असूनही आम्ही सुरक्षितपणे वावरत होतो.
ऑनलाईन अभ्यासानंतर सहा महिन्यांनी पुन्हा परतणार
पुढील सहा महिने आम्ही भारतात राहूनच युनिव्हर्सिटीने दिलेला ऑनलाईन अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आम्ही पुन्हा शिकण्यासाठी परत जाऊ, असा निर्धार स्वप्नील आणि भाग्यश्री या दोघांनीही व्यक्त केला.
मिठाई भरवून कुटुंबियांकडून स्वागत
विमानतळाबाहेर येताच स्वप्निलच्या आई-बाबांनी आणि कुटुंबीयांनी येऊन त्याला मिठी मारली व दोघांचेही मिठाई भरवून स्वागत केले. स्वप्निल नागपुरातील पार्डी पुनापूर येथे राहतो, तर भाग्यश्री गोंदिया जिल्ह्यातील कामठा या गावात राहते.
अन्य विद्यार्थीही सुखरूप परतावेत
भाग्यश्री आणि स्वप्नील म्हणाले, भारतभूमीवर पाय ठेवताच प्रचंड आनंद झाला. आम्हाला भारत सरकारने सुखरूपपणे परत आणले, तसेच अन्य विद्यार्थीही सुखरूपपणे मायदेशी परतावे, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.