नागपूर : समृद्धी महामार्गाचं काम नागपूरपर्यंत पूर्ण झालं आहे. सध्या बुलडाणा, वाशिम पट्ट्याचं काम सुरू आहे. २ मे रोजी समृद्ध महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्याच आठवड्यात केली होती. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी कार चालवल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते सेलूबाजार पर्यंत पूर्ण झाले आहे. मे अखेरपर्यंत हा महामार्ग खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी ताशी १७० च्या स्पीडने कार चालवत समृद्धी महामार्गावरून प्रवास केला.
या महामार्गाचा फायदा घेत विदर्भात औद्योगिकरण करा, युनिट्स उभारा व मेड इन विदर्भाच्या माध्यमातून तयार माल जगापर्यंत पोहचवा, असे आवाहन देशमुख यांनी केले. अतिशय चांगला असा हा रस्ता आहे. सरकारने अतिशय चांगलं काम केलं असून उद्घाटन झाल्यानंतर या महामार्गाच्या माध्यमातून घरा-घरापर्यंत समृद्धी आणा, असे देशमुख म्हणाले.
देशमुखांनी त्यांच्या बीएमडब्ल्यु कारमधून नागपूरहुन तब्बल २०० किमीचा प्रवास केला. त्यांनी याचा एक व्हीडिओदेखील बनवला असून या व्हिडिओमुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.