नागपूर : दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’मुळे मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले आहे. परंतु लक्षणे दिसताच तीन दिवसांतच मृत्यू व १८ वर्षे वय असल्याने तिला आणखी कुठला आजार तर नव्हता यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. असे असलेतरी, पाणीपुरी व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, असा सल्ला पोटविकारतज्ज्ञांनी दिला आहे.
दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’ हा पावसाळ्यात सर्वांत जास्त आढळून येतो. विषाणू, जिवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसगार्मुळे हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ यावाटे हा संसर्ग होऊ शकतो. यात पोट आणि आतड्यांना सूज येते. उलटी-जुलाब ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येणे, उलटी होणे, वारंवार पातळ जुलाब होणे, तोंड कोरडे पडणे, मूत्रविसर्जन कमी होणे, ताप अशी लक्षणे दिसतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात.
मेडिकलमधील नर्सिंग कॉलेजच्या १८ वर्षीय शीतलने पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतरच तिला आढळून आलेली लक्षणे ही गॅस्ट्रोएन्टेरायटीससारखीच होती. पहिले दोन दिवस तिने हा आजार अंगावर काढला. तिसऱ्या दिवशी लक्षणे तीव्र झाल्यानंतर दुपारी भरती झाली आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
-काळजी काय घ्यावी?
पावसाळ्यात व त्यानंतरही पाणी उकळून व गाळून प्यावे. घराबाहेर जाताना व सहलींच्या वेळीही पाण्याची बाटली सोबत ठेवावी. रस्त्यावरील बर्फाचा वापर केलेले थंड पेय, बर्फाचा गोळा खाऊ नये. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना स्वच्छ पाण्याचा वापर केला की नाही, विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत की नाहीत याची खात्री करून घ्यावी. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे.