नागपूर : सध्यस्थितीत एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत. पण पुढच्या काळात केंद्रीय नेतृत्व व राज्यातील तीनही नेते एकत्र बसून याबाबतचा निर्णय करतील. आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही. मुख्यमंत्रीपदासाठी कोणीच काम करत नाही, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे उद्धव ठाकरे यांचा चेहरा मान्य करण्यास तयार नाही. संजय राऊतांना रोज काहीतरी खोटं बोलायचे असतं म्हणून ते बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही २१ लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करणार आहोत. सगळ्या नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे. भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव प्रभारी आहेत. नितीन गडकरी यांनीही निवडणूक प्रचारासाठी एक महिना द्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे. गडकरी हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, ते जबाबदारीने पहिले पासून काम करत आहेत, ते आमच्या कोर कमिटीचे मेंबर आहेत, पार्लमेंटरी बोर्डाचे मेंबर आहेत, गडकरींना महाराष्ट्र हृदयाने प्रेम करतो, भारतीय जनता पक्षासाठी ते काम करणार आहे, एक वर्ग आहे, देशासाठी आदर्श आहेत लोकसभेत त्यांनी पंधरा दिवस महाराष्ट्राला दिले विधानसभेत एक महिना देतील, महाराष्ट्रासाठी नितीन गडकरी पूर्ण एक महिना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती कोणी किती जागा लढाव्या यासाठी आग्रह नाही. तर महायुतीचे सरकार यावे याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एकनाथजी से बैर नही, फडणवीस तेरी खैर नही’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून आले आहे. याचा अर्थ काय निघतो. सगळे मिळून फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.