नरेश डोंगरे
नागपूर : दरड कोसळणे, ट्रॅक वाहून जाणे, यासारख्या मान्सूनमुळे होणाऱ्या सर्व संभाव्य घटनांना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक उपकरणांसह तयारी पूर्ण केली आहे, असा दावा आज सकाळी मध्य रेल्वेने केला. आश्चर्य म्हणजे, काही तासातच जोरदार पावसाने मध्य रेल्वेचा हा दावा पोकळ ठरवत पुरता वाहून नेला. नागपूर - मुंबई रेल्वे मार्गावरील मुर्तीजापूर माना दरम्यान रेल्वे ट्रॅकच पावसाच्या पाण्याने पोखरून काढला. त्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून सर्वत्र उलट सुलट चर्चेचा बाजार गरम केला आहे.
मध्य रेल्वेने आज सोमवारी सकाळी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यात मध्य रेल्वेच्या क्षेत्रातील घाट विभाग, उंच कटिंग्ज, बोगदे, तीव्र उतार, वक्रता यातून जाणाऱ्या मार्गावरच्या रुळांवर दगड, दरड पडण्याची पावसाळ्यात शक्यता असते. सरसरी ५ हजार मिलिमिटर पाऊस पडतो. त्यामुळे भूस्खलन होते, खड्डे पडणे, ट्रॅक तुटणे, वाहून जाणे आदींची भीती असते. ते होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व कामे करण्यात आल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. मात्र, हा दावा सार्वजनिक होऊन अवघे सात ते आठ तास होत नाही तोच विदर्भात काही भागात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालून जोरदार प्रवाहाने पाणी वाहून जात असल्याने नागपूर - मुंबई रेल्वे मार्गावरील मुर्तीजापूर माना दरम्यानचा ट्रॅकच धोकादायक स्थितीत आला. पुलाच्या खालून पुराचे पाणी वाहून जावे, तशी स्थिती या घटनास्थळी निर्माण झाली. प्रारंभी त्या भागातील शेतकरी, गावकरी आणि रेल्वे ट्रॅकची गस्त करणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. हा भाग विदर्भात जरी येत असला तरी तो भुसावळ रेल्वे डिव्हीजनमध्ये येतो. त्यामुळे तिकडे कर्मचाऱ्यांसोबतच भुसावळ डिव्हीजनचे वरिष्ठ रेल्वे अधिकारीही पोहचले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गाने धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आहे, त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या. काही रेल्वे गाड्यांचे मार्गही वळविण्यात आले.
मोठा अनर्थ टळलाहा प्रकार लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. कारण काही वेळेतच या ठिकाणच्या ट्रॅकवरून अमरावती, बडनेरा, नागपूर -पुणे तसेच हावडा एलटीटी एक्सप्रेस जाणार होती. सायंकाळची वेळ आणि निर्जन ठिकाणी ट्रॅक खाली बोगदा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. अशात या ट्रॅकवरून रेल्वेगाडी गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने तसे काही झाले नाही.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी पोहचले आहेत. आवश्यक ते काम करून हा ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.जीवन चाैधरी
मध्य रेल्वे अधिकारी, भुसावळ डिव्हीजन.