नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व मानणारे आहेत. ते नेहमी देवदर्शनाला दिल्लीला जात असतात. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडण्यासाठी, तर उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करण्यासाठी ते दिल्लीला जातात. राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. ते सीमावादाच्या मुद्द्यावर केव्हा नवस करणार, असा रोखठोक सवाल शिवसेना पक्ष प्रमुख व विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
कानडी लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाहीत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट बघत आहोत, तो निकाल आल्यानंतर एक इंचही जमीन आम्ही कर्नाटकाला देणार नाही, असा दमही त्यांनी यावेळी भरला. हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाया गेल्याचे ते म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिल्याची प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.
- बॉम्बला फक्त पेटवायचा अवकाश आहे
आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.