नागपूर : शिवसेना व भाजपची युती झाली होती तेव्हा १९८९ साली मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपणही उपस्थित होतो. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल, असे त्याचवेळी ठरले होते. त्यानुसार १९९५ ते ९९च्या काळात चार साडेचार वर्षांत भाजपने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही. मग अचानक आता निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद कसे मागितले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी नागपूर शहर व जिल्हा तर सोमवारी गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभानिहाय बैठका घेतल्या. यानंतर रविभवनात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी उद्धव यांनी आधीच का सांगितल्या नाही, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एवढा गोंधळ कधीच पाहिला नाही. निवडणुका एकाशी मिळवू लढवता अन् पहाटे शपथविधी दुसऱ्याशीच होतो. नंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येते. ही तर मतदारांची प्रतारणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमूक गोष्ट फुकट द्या, अशा मागणीसाठी आजवर एकही मोर्चा निघालेला नाही. राजकीय पक्षच स्वार्थासाठी फ्री च्या घोषणा करतात. आपल्याला अर्थव्यवस्था बरबाद करायची आहे का, असा सवाल करीत अशा फुकट्या लोकांना थारा देऊ नका, असा चिमटाही त्यांनी घेतला.
वेदांता-फॉक्सकॉन का गेला, याची चौकशी व्हावी
- देशात कोणताही उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र असते. मात्र, वेदांता-फॉक्सकॉनच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला, कुठे फिस्कटले, यात काही पैसे मागितले होते का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
विदर्भाबाबत जनतम घ्या
- वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला बळ देण्यासाठी राजनीतिकार प्रशांत किशोर हे २० रोजी नागपुरात बैठक घेत आहेत. याकडे लक्ष वेधले असता विदर्भाबाबत जनमत घ्या, कोणत्या खासगी संस्थेमार्फत नाही तर निवडणूक होते तसे घ्या. वेगळे व्हायचे की नाही हे तेथील जनतेला ठरवू द्या, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका व्हाव्या
- तीन-चार सदस्यीय प्रभाग लोकशाहीसाठी घातक आहे. चार-चार नगरसेवक असले तर जनतेने कामांसाठी कुणाकडे जायचे. त्यातही दोन पक्षांचे दोन-दोन निवडून आले तर एकमेकांना कामे करू देत नाहीत. राजकीय पक्षाच्या हितासाठी जनतेचे नुकसान करणे सुरू आहे. त्यामुळे एक सदस्यीय वॉर्ड पद्धतच असावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. ज्याचे बहुमत असेल त्याचा सरपंच, ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर, हेच योग्य आहे. या सर्व पद्धती का बदलल्या जात आहेत, निवडणूक आयोग काय करतोय, असा सवालही त्यांनी केला.