नागपूर : राज्यातील मुख्य खुर्ची सप्टेंबर महिन्यात बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लवकरच महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. आमचं सरकार येईल, असे मी म्हणत नाही. पण खात्रीशीर सांगतो की, सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल. हे मी ठासून सांगतो आहे की, येत्या १५ दिवसात काय बदल होईल हे जनता बघेल, असा दावा वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तळाच्या भूवया उंचावल्या आहेत.
वडेट्टीवार म्हणाले, कार्यक्रमांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सहसा एकत्र दिसत नाहीत. कधी पुण्याचे तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी मुख्यमंत्री नसतात. यावरून सर्वकाही आलबेल आहे की नाही, अशी शंका येते. पण जनतेला हा खडा तमाशा दिसतो आहे. सत्तेच्या हव्यासापोटी यांनी माहाराष्ट्राची पत घालविली आहे. सत्तेसाठी वाटेल ते सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
कोरडा दुष्काळ सरकारला घोषित करावा लागेल
राज्यात २२ दिवसांपासून पावसाने दडी दडी मारली असून त्यामुळे पीक संकटात आले आहे. नाथसागर धरण फक्त ३४ टक्के भरले आहे. ११ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी लागेल, अशी परिस्थती आहे. सरकारला जवाबदारी स्वीकारून काम करावे लागेल व कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एक रुपयात पीक विमा काढणारे सरकार कशी मदत करते हे आता पहावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.