नागपूर : गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका १४ तालुक्यांना बसला आहे. तेथे अतिवृष्टीची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यातील सहा, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तर वर्धा जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
गडचिराेलीतील सिरोंचा तालुक्यात १७१.१ मिमी आणि अहेरी १२६.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. या दाेन तालुक्यांसह दक्षिण गडचिराेलीला सर्वाधिक फटका बसला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यात नागपूर तालुका (७२ मि. मी.), नागपूर ग्रामीण (६६.६ मि. मी.), हिंगणा (७२ मि. मी.), काटोल (७३ मि. मी.), नरखेड (६४ मि. मी.), कळमेश्वर (१०२ मि. मी.) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पाऊस कळमेश्वर तालुक्यात झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत ५२ मि. मी. पाऊस झाला. चंद्रपूर (७८ मि. मी.), वरोरा (८० मि. मी.), भद्रावती (८८.४ मि. मी.) चिमूर (६७.९ मि. मी.) आणि बल्लारपूरमध्ये (८० मि. मी.) पावसाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात ३९ मि. मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात (८२ मि. मी.) अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या दरम्यान पडलेला पाऊस ३३६.३९ मि.मी असून त्याची टक्केवारी २१२.३ अशी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नदी-नाले फुगले
चंद्रपूर जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानराड ही चार जलाशये फुल्ल झाली आहेत. इरई धरणात ७१.३५ टक्के जलसाठा भरल्याने सोमवारी धरणाचे दोन दरवाजे ०.२५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी महानिर्मितीने इरई नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पुरामुळे कापूस, सोयाबीन, तूर, धान, भाजीपाला पिके पुराच्या पाण्याखाली आहेत. गाेंदिया जिल्ह्यात सोमवारीही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती तर दुपारदरम्यान पावसाचा जोर हाेता. भंडारा जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप सुरू होती. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणासमोरील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, २४ तासांत अप्पर वर्धा धरण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असल्यास धरणातून पाणी सोडले जाऊ शकते.