नागपूर : दाेन दिवसात थंडी वाढेल, हा हवामान विभागाचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरला. उलट आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले असून गुरुवारी विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली. ढगाळ वातावरणामुळे थंडीची वाट राेखली असून बहुतेक जिल्ह्यात २४ तासात पारा ३ ते ४ अंशाने उसळला. नागपुरात किमान तापमान सरासरीपेक्षा ५.३ अंशाने चढले आहे.
१४ जानेवारीपासून आकाशातून ढगांची गर्दी हटली हाेती आणि आकाश निरभ्र झाले हाेते. त्यामुळे उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव विदर्भासह महाराष्ट्रात पाेहचेल, असा अंदाज हाेता. मात्र तीन दिवसात वातावरण पुन्हा बदलले आणि बुधवारपासून आकाश पुन्हा ढगांनी व्यापले. गुरुवारीही ढगाळ वातावरण कायम हाेते. दक्षिण कर्नाटकात तयार झालेले झंझावात तेलंगना व विदर्भाच्या मार्गाने छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. दुसरीकडे दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. या प्रभावाने नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले. ढगाळ वातावरणामुळे दिवसाचा पारा अंशत: खाली आला असल्याने हवेतून गारवा जाणवत आहे. गुरुवारी नागपुरात २७.७ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा १.५ अंश कमी आहे. पश्चिम विदर्भात मात्र ढगाळ वातावरण नसल्याने दिवसाचा पारा वाढल्याची स्थिती आहे.
रात्रीच्या तापमानात मात्र कमालीची वाढ झाली आहे. सर्वत्र २ ते ४ अंशाने किमान तापमानाची वाढ झाली आहे. नागपुरात गुरुवारी १८.६ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. वर्धा, ब्रम्हपुरीतही पारा १८ अंशावर गेला. अकाेला २.६ अंश, अमरावती ३.८ अंश तर बुलढाण्यात ४.१ अंश किमान तापमान २४ तासात वाढले. गाेंदियात हलक्या पावसाचे थेंबही पडले. त्यामुळे सध्या थंडी वाढण्याची शक्यता कमी झाले आहे.