मोरेश्वर मानापुरे
नागपूर : गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक रोजगार देणाऱ्या विदर्भातील बहुतांश उद्योगांनी लगतचे छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाना राज्यात पलायन केले आहे. विजेच्या सर्वाधिक दरामुळे विदर्भातील उद्योगांची स्थिती गंभीर आहे. याकरिता राज्याचे वीज धोरण कारणीभूत आहेत. मिहान, सेझ, बुटीबोरी, नवीन बुटीबोरीत आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये काही वर्षांत नवीन उद्योग आले नाहीत. २०१२ च्या तुलनेत २०२२ मध्ये लघु उद्योगांचे विजेचे दर दुपटीवर अर्थात प्रतियुनिट लघु दाबानुसार १२.५० ते १६.५४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दरात लघु उद्योगांचा स्पर्धेत टिकाव लागणार नाही, शिवाय दर अन्य राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक असावेत, अशी उद्योजकांची मागणी आहे.
- महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये उद्योग का जातात, याचे उदाहरण देताना विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या एनर्जी सेलचे अध्यक्ष आर.बी. गोयनका म्हणाले, नवीन बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात गोयल प्रोटिन्स कंपनीचे उत्पादन काही महिन्यांआधी सुरू झाले आहे. या कंपनीला वीज पुरवठा मिळविण्याकरिता एक वर्ष लागले. गुजरातमध्ये नवीन उद्योगाला केवळ सात दिवसात विजेचा अखंड पुरवठा सुरू होतो. अशा स्थितीत नवीन उद्योग महाराष्ट्राऐवजी लगतच्या राज्यातच जाईल.
- स्टील उद्योगात विजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने या उद्योगात विजेची भूमिका महत्त्वाची आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील वीजदर जास्त असल्याने विदर्भातील ८० टक्के स्टील उद्योग बंद पडले आहेत. या उद्योगाला इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ५ रुपये प्रतियुनिट दराने वीज उपलब्ध करून देण्याची स्टील उद्योजकांनी मागणी आहे. कधी काळी विदर्भातून अन्य राज्यात स्टीलचा पुरवठा व्हायचा; पण आता छत्तीसगडमधून सर्वाधिक स्टील विदर्भात येते. याकरिता केवळ विजेचे दर कारणीभूत आहेत.
वीजदराचा उद्योगांच्या श्रेणीनुसार तुलनात्मक प्रतियुनिट तक्ता :
राज्य ए बी सी डी एलटी-१ एलटी-२
महाराष्ट्र ९.३८ १३.३३ ९.५५ १३.३३ १६.५४ १३.५०
छत्तीसगड उद्योग ६.०६ ९.३५ ७.२३ ८.५५ ७.२९ ८.११
छत्तीसगड स्टील ५.२८ ८.९० ६.४८ ८.५० -- --
मध्य प्रदेश ६.८२ -- ७.११ -- १०.७० १०.०२
तेलंगाना -- -- -- -- ९.२० ८.९५
मिहानमध्ये विजेचे ६ रुपये युनिट दर!
मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने प्रति युनिट २.९० रुपये दराने वीज देण्याची घोषणा केली होती. वीजपुरवठा खासगी कंपनी करणार होती; पण आता स्थिती विपरित आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी महावितरणकडून ४.५० रुपये प्रति युनिट वीज खरेदी करते. त्यावर १.५० रुपये डिमांड शुल्क आकारून उद्योगांना प्रति युनिट ६ रुपये दराने वीजपुरवठा करते.