नागपूर : विस्तारा एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये ज्या चिमुकलीवर डॉक्टरांनी उपचार करून धोक्याबाहेर काढले होते, त्या चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिला येथील एका खासगी ईस्पितळात वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
२७ ऑगस्टच्या रात्री बेंगळुरू येथून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या यूके -८१४ फ्लाईटमध्ये या १५ महिन्यांच्या चिमुकलीची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) देऊन तिच्यावर मर्यादित साधनाने उपचार केले होते. त्यानंतर येथे विमानाचे ईमर्जेन्सी लॅण्डींग करून चिमुकलीला येथील किम्स - किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तिच्यावर उपचार सुरू आहे. ती बेशुद्ध असून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या आईवडीलांना तसेच नातेवाईकांना या संबंधाने नियमित माहिती देऊन त्यांचे समुपदेशन केले जात असल्याचे ईस्पितळाचे उपमहाव्यवस्थापक एजाज शमी यांनी सांगितले आहे.