नागपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्या व निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान दिले आहे. तर शिवसेना (शिंदे गट) चे नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी या निकालामुळे आता शिंदे गटाकडे इनकमिंग वाढणार असल्याचे सांगत आधी ते थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.
किशोर कुमेरिया म्हणाले, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना ताशेरे ओढले ते पाहून सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाले. केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेत हे सरकार तरले आहे. गद्दार म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. जर खरंच बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असाल तर सत्तेला लाथ मारा व सरकारच्या बाहेर पडा व निवडणुकीला सामोरे जा, अन्यथा वंदनीय बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. थोडी फार नैतिकता असेल तर पदाचा राजीनामा द्या. जनतेच्या आख्याड्यात या, जनता कोणासोबत आहे हे दिसेल, असे आव्हानही कुमेरिया यांनी दिले.
यावर मंगेश काशीकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला आहे. जे झाले ते झाले. तो निर्णय बदलू शकत नाही. मुळात आता राजीनामा मागणे हेच चुकीचे आहे. सरकार पुढे चालत राहील. सरकारला धोका नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी न्यायालयीन लढा लढावा. आम्ही देखील पाठपुरावा करू. मात्र, आजवर बरेच नेते व शिवसैनिक कुंपनावर बसून विचार करीत होते, ते या निर्णयाला पाहून कुंपन ओलांडतील. शिंदे गटाकडे येणाऱ्यांचा ओढा वाढणार आहे. त्यांना कसे थांबवायचे याचा विचार आता ठाकरे गटाने करणे आवश्यक आहे, असा टोलाही काशीकर यांनी लगावला.
राष्ट्रवादी म्हणते विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवावी
- सर्वोेच्च न्यायालयाने निकाल दिला. आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता बाळगून १६ आमदारांच्या अपात्रतेवर त्वरित निर्णय घ्यावा. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे, व्यक्त केलेली नाराजी याला बगल दिल्या सारखे होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर पुढे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी नैतिकता दाखवून कृती करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केली.
कृपाल तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष