नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११०वा दीक्षांत समारंभ गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात थाटात पार पडला. या साेहळ्यात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांमधून १०८ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १५७ सुवर्ण पदके, ९ राैप्य पदके आणि २९ राेख पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर २८० संशाेधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. शुभांगी परांजपे यांना मानवविज्ञान शाखेतील ‘मानवविज्ञान पंडित’ (डी.लिट.) पदवी राज्यापालांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाच्या दीक्षांत समाराेहात महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ. टी. जी. सीताराम व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. समारंभात हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १ लाख १७२२ विद्यार्थ्यांना पदवीदान, तर ३३० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आले. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ९७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३८, मानव विज्ञान विद्याशाखेचे ११३ व आंतर विद्याशाखीय ३२ संशाेधकांचा समावेश आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून उत्कृष्ट गुणांनी बीए.एलएलबीची पदवी प्राप्त करणाऱ्या नंदिनी समीर साेहाेनी या विद्यार्थिनीला ७ सुवर्ण पदके व दाेन राेख पारिताेषिक प्रदान करण्यात आले. डाॅ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्चमधून एमबीए करणाऱ्या विक्की सुधाकर पडाेळे या विद्यार्थ्याला सात सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. यासह एलएलबीची अनुप्रिया प्रसादला पाच सुवर्ण पदके, एमएससी रसायनशास्त्र विषयात कमलदास गिर्हेपुंजे यांनी चार सुवर्ण व एक राैप्य, एमए मराठीच्या साेमराज गिरडकर याला चार सुवर्ण व एक पारितोषिक आणि डाॅ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या राजश्री ढबाले यांना ४ सुवर्ण व १ पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
विविध विद्याशाखेतील पदवीप्राप्त
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे : ३२,७०९
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : २७,९२५
मानव विज्ञान विद्याशाखा : २५,६५९
आंतरविद्याशाखा : ८०७७
स्वायत्त महाविद्यालये : ७३५१
चार संशाेधकांना मरणाेपरांत आचार्य
संशाेधन पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या कारणाने मृत्यूस प्राप्त झालेल्या ४ संशाेधकांना यावेळी मरणाेपरांत आचार्य पदवी प्रदान करण्यात आले. यामध्ये काेराेनामुळे प्राण गमावलेल्या दिनेशकुमार देवदास यांना संगीत विषयात, तर सचिन बडवाईक यांना लायब्ररी विज्ञान शाखेतील संशाेधनासाठी आचार्य पदवीप्रदान करण्यात आले. यासह सजीवशास्त्र विषयात अर्चना भाेगाडे यांना व पूनम राेहित बाेथरा यांना अर्थशास्त्र विषयात मरणाेपरांत आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मान स्वीकारला.